READ FACTS: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नेहरुंनी युद्ध गुन्हेगार म्हटले होते का?

False राजकीय | Political

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी पं. जवाहरलाल नेहरुंची नेमकी कशी भूमिका होती याविषयी अनेक वाद आहेत. नेताजी बोस यांच्या मृत्यूसंबंधीसुद्धा नेहरुंवर नेहमीच आरोप होतात. सोशल मीडियावरील सध्या पोस्ट पसरविली जात आहे की, नेहरुंनी सुभाषचंद्र बोस यांना युद्ध गुन्हेगार म्हटले होते. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना दिसतात. सोबत लिहिलेले आहे की, नेहरुंनी सुभाषचंद्र बोस यांना युद्ध गुन्हेगार संबोधून त्यांचा अपमान केला होता. परंतु, मोदींनी नेताजींना जागतिक नेते असे संबोधून त्यांचा उचित सन्मान केला.

तथ्य पडताळणी

नेहरुंनी सुभाषचंद्र बोस यांना खरंच युद्ध गुन्हेगार (War Criminal) म्हटले का, याचा शोध घेत असताना इंटरनेटवर आम्हाला तीन पत्र मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जानेवारी 2016 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित गोपनीय माहिती असलेल्या १०० फाईल्स सार्वजनिक केल्या होत्या. या फाईल्समध्ये नेहरुंनी ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान क्लिमेंट अ‍ॅटली यांना लिहिलेल्या एका पत्रात सुभाषबाबुंचा ‘युद्ध गुन्हेगार’  असाल उल्लेख केल्याचा दावा केला जातो.

या कथित पत्रात नेहरू लिहितात की, माझ्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार स्टॅलिनने तुमचे युद्ध गुन्हेगार सुभाषचंद्र बोस यांना रशियामध्ये आश्रय दिला आहे. ब्रिटन आणि अमेरिकेसोबतचे मित्र राष्ट्र असूनही रशियाने बोस यांना आश्रय देऊन विश्वासघात केला. याची नोंद घेऊन आपल्याला जी योग्य वाटेल ती कारवाई करावी.

आम्हाला मिळालेल्या तिन्ही पत्रांची एक-एक करून तपासणी करू.

पत्र क्र. 1

जवाहरलाल नेहरू यांनी 26 डिसेंबर 1945 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान क्लिमेंट अ‍ॅटली यांना पत्र लिहिल्याचे यामध्ये दिसते. पत्राच्या इंग्रजी मजकुरामध्ये अनेक चुका आहेत. जसे की, सुभाषबाबुंच्या नावाची इंग्रजी स्पेलिंग Subhas आहे. पत्रात Subhash लिहिले आहे. रशियाची स्पेलिंगदेखील (Russia) चुकली आहे. Consider या शब्दाला Concider, तर पत्राच्या शेवटी Sincerely ऐवजी Sencerely लिहिले आहे. विशेष म्हणजे जवाहरलाल यांचे नावच (Jwaharlal) चुकीचे लिहिले आहे. ते “ज्वाहरलाल” असे झाले.

नेहरुंसारखा इंग्रजीवर प्रभुत्व असणारा व्यक्ती दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहिताना तरी किमान अशा चुका करणार नाही. तसेच पत्रावर राष्ट्रीय अभिलेखागाराचा (National Archives of India) वॉटरमार्कदेखील नाही. त्यामुळे हे पत्र बनावट आहे.

पत्र क्र. 2

पहिले पत्र 26 डिसेंबर तर हे पत्र 27 डिसेंबरचे आहे. या पत्रातदेखील इंग्रजी स्पेलिंगच्या चुका आहेत. यात पंतप्रधान क्लिमेंट अ‍ॅटली याचे नावच चुकविले आहे. त्यांच्या नावाची योग्य स्पेलिंग Attlee अशी आहे. तसेच ते इंग्लंडचे नाही तर, युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान होते. त्यांच्या पदाबाबत अशी चूक होणे अपेक्षित नाही. या पत्रावरसुद्धा राष्ट्रीय अभिलेखागाराचा (National Archives of India) वॉटरमार्क नाही. त्यामुळे हे पत्रदेखील बनावट आहे.

पत्र क्र. 3

या पत्रावर राष्ट्रीय अभिलेखागाराचा (National Archives of India) वॉटरमार्क आहे, यामध्ये इंग्रजी मजकूरदेखील योग्य आहे. मग हे पत्र खरे आहे का?

पत्रकार राहुल कंवल यांनी 23 जानेवारी 2016 रोजी हे पत्र ट्विट करून लिहिले की, नेहरुंच्या स्टेनोग्राफरने खोसला कमिशनमसोर सादर केल्याल्या प्रतिज्ञापत्रातील हे पत्र वाचा. हे ट्विट येथे पाहा – ट्विटअर्काइव्ह

नेताजींच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यासाठी सत्तरच्या दशकात खोसला कमिशन स्थापन करण्यात आले होते. खोसला कमिशनसमोर स्टेनोग्राफर श्यामलाल जैन यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. परंतु, कमिशनने ते आपल्या अहवालात समाविष्ट केले नव्हते. म्हणजे ते खोसला कमिशनच्या अहवालात असल्याचा दावा असत्य आहे. (संदर्भ: बिझनेस स्टँडर्ड)

राहुल कंवल यांच्या ट्विटला उत्तर देताना पत्रकार रघु कर्नाड यांनी ट्विट केले की, स्टेनोग्राफरची नोट खोसला कमिशनमधील नसून, नेताजींचे पुतणे प्रदीप बोस यांनी 1998 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना लिहिलेल्या पत्रातील आहे. शासनाच्या नेताजी पेपर्स वेबसाईटवरील “Disappearance/death of Netaji Subhas Chandra Bose 915/11/C/6/96-Pol” फाईल्समध्ये याचा संदर्भ आढळतो.

अर्काइव्ह

प्रदीप बोस यांनी लिहिलेल्या Subhas Bose and India Today: A New Tryst with Destiny? या पुस्तकाच्या पान क्रमांक 277-78 वर श्यामलाल जैन यांनी उल्लेख केलेल्या नेहरुंचे पत्र दिले आहे. जैन यांच्या दाव्यानुसार, नेहरुंनी त्यांना 26 किंवा 27 डिसेंबर 1945 यापैकी एका दिवशी असफ अली यांच्या घरी बोलावून इंग्लंडच्या पंतप्रधानांसाठी वरील पत्र लिहून घेतले होते. ते पुस्तक तुम्ही येथे वाचू  शकता – गुगल बुक्स

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी श्यामलाल जैन यांचा दावा कसा खोटा हे सिद्ध करणारा एक लेख ट्विटरवर शेयर केला होता. यामध्ये नेहरू 26 ते 29 डिसेंबर 1945 दरम्यान अलाहाबाद येथे होते, जैन यांनी म्हटल्यानुसार नवी दिल्ली येथे असफ अली यांच्य घरी नव्हते, असे पुराव्यांनिशी सिद्ध केले आहे.

अर्काइव्ह

द हिंदू दैनिकाने 24 जानेवारी 2016 रोजी दिलेल्या बातमीत सुभाषचंद्र बोस यांचे अभ्यासक आणि लंडनस्थित पत्रकार आशिष रे यांनी नेहरुंनी नेताजींना युद्ध गुन्हेगार म्हटल्याचे पत्र लिहिलेच नव्हते, असे स्पष्ट सांगितले होते. ते म्हणाले की, “कोलकात्यातील नेहरूविरोधी आणि ‘कथित’ बोस समर्थकांनी या पत्राची बनावट कहाणी रचली आहे. नेहरुंनी असे पत्र लिहिलेच नव्हते.”

मूळ बातमी येथे वाचा – द हिंदूअर्काइव्ह

निष्कर्ष

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे स्पष्ट होते की, नेहरुंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना “युद्ध गुन्हेगार” म्हटल्याचे पत्र बनावट आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:READ FACTS: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नेहरुंनी युद्ध गुन्हेगार म्हटले होते का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False