
नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना गृहमंत्रीपद देण्यात आले. एक जून रोजी शहा यांनी पदभार स्वीकारला. यानंतर लगेच सोशल मीडियावर त्यांनी घेतलेल्या एका कथित निर्णयाच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. या पोस्टनुसार, नव्या गृहमंत्र्यांनी निर्णय घेतला की, भारतात कुठेही आणि कोणीही पाकिस्तानचा झेंडा मिरवला तर त्या व्यक्तीला देशद्रोहाच्या कायद्याखाली अटक केली जाईल. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

अशी पोस्ट फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेयर केली जात आहे.

तथ्य पडताळणी
अमित शहा यांनी गृहमंत्री झाल्यावर खरंच असा काही निर्णय घेतला का याचा शोध घेतला. अमित शहा यांनी शनिवारी 1 जून रोजी पदभार स्वीकारला. पोस्टमध्ये उल्लेख केलेला निर्णय त्यांनी घेतल्याची कोणतीही बातमी इंटरनेटवर उपलब्ध नाही. त्यांनी जर असा काही निर्णय घेतला असता तर नक्कीच ती मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही दैनिकाने अशी बातमी दिलेली नाही.
अमित शहा यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरदेखील अलिकडे केवळ पदभार स्वीकारतानाचा आणि राष्ट्रीय पोलिस स्मारकाला भेट देऊन शहिदांना अभिवादन केल्याचे फोटो दिलेले आहेत. त्यांनी अशी काही घोषणा केल्याचे ट्विट उपलब्ध नाही.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरसुद्धा केवळ या दोन प्रसंगांचीच प्रेस रिलीज उपलब्ध आहे. अमित शहा यांच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील त्यांनी पाकिस्तानी झेंडा फडकावणाऱ्यांविरोधात असा काही निर्णय घेतल्याची माहिती आढळून आली नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने मग गृहमंत्रालयाशी थेट संपर्क साधला. तेथील पत्र व सूचना विभागाच्या (पीआयबी) अधिकाऱ्याने हे वृत्त असत्य असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, अमित शहा किंवा गृहमंत्रालयाने अद्याप असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे व्हायरल पोस्टमधील माहिती सत्य नाही.

काय आहे देशद्रोहाचा कायदा?
भारतीय दंड विधानात १२४ (अ) हे कलम राजद्रोह/देशद्रोहाचा कायदा म्हणून ओळखले जाते. या कलमानुसार, भारतात कायद्याद्वारे स्थापित झालेल्या सरकारविरोधात कोणीही, शब्दांनी, लिखित अथवा वाचिक, किंवा काही चिन्हांनी अथवा दृश्य प्रातिनिधिकतेने, किंवा इतर कोणत्याही माध्यमातून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल अथवा सरकारचा अवमान करत असेल किंवा सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न अथवा असंतोष निर्माण करत असेल, तर त्यास आजीवन कारावास, ज्यात आर्थिक दंडाचाही समावेश असेल, किंवा तीन वर्षांचा कारावास व आर्थिक दंड किंवा आर्थिक दंड, ही शिक्षा केली जावी. (संदर्भः लोकसत्ता)
निष्कर्ष
भारतात कुठेही आणि कोणीही पाकिस्तानचा झेंडा मिरवला तर त्या व्यक्तीला देशद्रोहाच्या कायद्याखाली अटक केली जाईल, असा अमित शहांनी निर्णय घेतलेला नाही. गृहमंत्रालयाने तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Title:भारतात पाकिस्तानचा झेंडा मिरवल्यास अटक करण्याचा अमित शहा यांनी निर्णय घेतला का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
