तथ्य पडताळणीः देवेंद्र फडणवीस देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री?

True राजकीय राष्ट्रीय

(Image is for representation purpose only. Source: The Statesman)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशातील सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. या बातमीत दावा करण्यात आला की, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तब्बल 22 गुन्हे दाखल असून ते सर्वाधिक गुन्हे दाखल असेलेले मुख्यमंत्री ठरले आहेत. या दाव्याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली.

एबीपी माझाने ही बातमी 13 फेब्रुवारी रोजी दिली होती. परंतु, मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुक पेजवरून ही बातमी 22 मार्च रोजी शेयर करण्यात आली. पडताळणी करेपर्यंत ही बातमी 1100 पेक्षा जास्तवेळा शेयर करण्यात आली. तसेच या बातमीच्या पोस्टला 8500 पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.

अर्काइव्ह

या पोस्टखाली अनेकांनी संताप व्यक्त करीत आक्षेप नोंदविला. एका यूजरने लिहिले की, अधर्वट बातमी नका देत जाऊ. किमान माहिती पूर्ण देत जा. म्हणजे लोकांची दिशाभूल होणार नाही. अनेकांनी या बातमीवरून राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला. यावरून हे स्पष्ट होते की, लोकांना या बातमीबद्दल संभ्रम आहे.

तथ्य पडताळणी

एबीपी माझाने ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’च्या (एडीआर) अहवालाचा दाखला देत बातमी दिली की, देशातील 29 राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक 22 गुन्हे दाखल आहेत. यापैकी तीन गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत.

मूळ बातमी येते वाचा – एबीपी माझाअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने एडीआरचा मूळ अहवाल तपासण्यासाठी त्यांच्या अधिकृत स्थळावर भेट दिली. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम-ए) या महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी 1999 साली ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ची (एडीआर) स्थापना केली होती. निवडणुकांचे विश्लेषण आणि उमेदवारांची संपत्ती व गुन्हेगारी रेकॉर्डसच्या माहितीचा अहवाल एडीआरतर्फे प्रसिद्ध करण्यात येतो.

एडीआरच्या Analysis of Chief Ministers from 29 State Assemblies and 2 Union Territories of India नामक अहवालामध्ये देशातील 31 मुख्यमंत्र्यांची आर्थिक व गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयी माहिती दिली आहे. अहवालानुसार, 31 मुख्यमंत्र्यांपैकी 11 जणांवर (35 टक्के) कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पैकी 26 टक्के मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे (उदा. खून, खूनाचा प्रयत्न, फसणवूणक) दाखल आहेत.

अहवालानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकुण 22 गुन्हे दाखल आहेत. 11 गुन्ह्यांसह केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (10 गुन्हे) यांचा क्रमांक लागतो.

मूळ अहवाल येथे वाचा – एडीआर अहवालअर्काइव्ह

देवेंद्र फडवणवीस यांच्याविरोधात 3 गंभीर स्वरूपाचे तर 19 इतर गुन्ह्यांची नोंद आहे. गंभीर स्वरूपामध्ये आयपीसी-134 आणि आयपीसी-324 अंतर्गत गुन्हे आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील गुन्हे सविस्तरपणे अहवालाच्या पान क्र. 12 वर वाचू शकता.

यावरून दिसून येते की, एबीपी माझाने एडीआर अहवालानुसारच बातमी दिली आहे. डेक्कन क्रोनिकलनेदेखील या अहवालावरून बातमी केली आहे. ती येते वाचा – डेक्कन क्रोनिकलअर्काइव्ह

पण एडीआर अहवालातील माहितीची सत्यता काय? हा प्रश्न उरतोच. अहवालात म्हटले आहे की, सदरील आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे गोळा करण्यात आली आहे. म्हणून मग आम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली.

येथे आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली निवडणुकीसाठी भरलेले प्रतिज्ञापत्राची मूळ प्रत सापडली. या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वतः फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात 22 गुन्हे दाखल असल्याचे नमूद केले आहे. म्हणजे हा अहवाल आणि एबीपी माझाची बातमी सत्य आहे.

मूळ प्रतिज्ञापत्र येथे वाचा किंवा डाऊनलोड करा – प्रतिज्ञापत्र

निष्कर्ष

एडीआर अहवाल आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता देवेंद्र फडणवीसांविरोधात 22 गुन्हे दाखल असून देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ही बातमी सत्य आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः देवेंद्र फडणवीस देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: True