
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 13 जानेवारी रोजी छापेमार केली. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ही कारवाई करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर नाना पाटेकरांची एक प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी मुश्रीफ यांचे समर्थन करताना त्यांना ‘चांगला नेता’ म्हटले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना असून यामध्ये नाना पाटेकर अजित पवारांविषयी बोलत होते.
काय आहे दावा?
व्हायरल व्हिडिओमध्ये नाना पाटेकर म्हणतात की, “तो माणूस जितकं काम करतो त्याची जाहीरात कधीच करत नाही. इमानानं गपचुप आपलं काम करत राहतो. एखादी कुठली चुकीची गोष्ट असेल तर तेवढीच तुम्ही अधोरेखीत करता तुम्ही मंडळी; पण त्याने केलेलं काम समोर आणा. तो खरंच चांगला नेता आहे, चांगला पुढारी आहे.”
या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “आमदार हसनसाहेब मुश्रीफ नाना पाटेकर यांच्या निवासस्थानावर पडलेल्या ईडीच्या धाडीनंतर प्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया.”
मूळ पोस्ट – इन्स्टाग्राम । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हायरल व्हिडिओतील कीफ्रेम्सला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर कळाले की, हा व्हिडिओ एका वर्षापूर्वीचा आहे.
एबीपी माझा वाहिनीच्या युट्युबवर नाना पाटेकर माध्यमप्रतिनिधींशी बोलतानाचा व्हिडिओ उपलब्ध आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते की, नाना पाटेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी बोलत होते.
मूळ व्हिडिओमध्ये 1.30 मिनिटांपासून तुम्ही पाहू शकता की, पत्रकारांनी नाना पाटेकरांना अजित पवारांच्या कामाविषयी प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर बोलताना त्यांनी अजित पवारांचे कौतुक करताना त्यांना ‘चांगला नेता, चांगला पुढारी’ म्हटले होते.
महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार, अजित पवार यांनी 22 जानेवारी 2022 रोजी पुण्यातील विधानभवनात जिल्हा कोरोना आढावा बैठक घेतली होती. या बैठकीपूर्वी नानांनी अजित पवारांची भेट घेतली होती.
त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, ‘राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही. आम्हाला जास्त प्रसिद्धी मिळते. अजित पवार हे इमानाने गुपचूप काम करत राहतात. जाहिरात करत नाहीत. एखादी कुठली गोष्टी चुकली की मीडिया लगेच ते अधोरेखित करतो. पण अजित पवारांनी केलेलं काम लोकांसमोर आणा.”
व्हायरल क्लिपची मूळ व्हिडिओशी तुलना केल्यावर लगेच कळते की, नाना पाटेकरांनी ज्यावेळी अजित पवारांचे नाव घेतले तो भाग एटिड करून व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह पसरविण्यात येत आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, नाना पाटेकरांचा जुना व्हिडिओ सोयीने एडिट करून पसरविला जात आहे. नानांनी हसन मुश्रीफ यांचे समर्थन करताना त्यांचे कौतुक केलेले नाही. नाना व्हायरल क्लिपमध्ये अजित पवारांविषयी बोलत होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:Clipped Video: हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी त्यांची पाठराखण केली का?
Fact Check By: Agastya DeokarResult: Altered
