
दिवसाढवळ्या एका जोडप्याची लूट करतानाचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या व्हिडियोमध्ये दुचाकीवर आलेली चार मुले कारमधील एका जणाला धमकावून त्याच्याकडील ऐवज घेऊन पळताना दिसतात. दावा केला जात आहे की, ही घटना मुंबईतील घाटकोपर भागातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये म्हटले की, मुंबईतील घाटकोपर भागात 10-12 वयाच्या चार मुलांनी असे भरदिवसा लुटले. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. सदरील मुले एक विशिष्ट समुदायाची असण्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
घाटकोपरमध्ये अशी घटना खरंच घडली का याचा गुगलवर शोध घेतला असता एकही बातमी आढळली नाही. त्यामुळे ही घटना नेमकी कुठली आहे याविषयी शंका बळावली. व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून यांडेक्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून ट्विटरवरील एक व्हिडियो समोर आला. इस्लामाबाद नावाच्या युजरने 26 ऑगस्ट 2019 रोजी हा व्हिडियो ट्विट करून म्हटले की, ही घटना मध्य कराची भागातील आहे.
हा धागा पकडून जेव्हा अधिक शोध घेतला तेव्हा, डॉन न्यूजच्या युट्यूब चॅनेलवरील या घटनेचा व्हिडियो आढळला. यामध्येसुद्धा ही घटना कराचीमधील असल्याचे म्हटले आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.
पाकिस्तानातील समा टीव्हीच्या वेबसाईटवर 26 ऑगस्ट रोजीच्या या घटनेची बातमी आणि व्हिडियो दिलेला आहे. त्यानुसार, कराचीमधील गुलबर्गा भागात चार कुमारवयीन मुलांनी एका जोडप्याला लुटले होते. यामध्ये त्यांनी रोकड आणि दागिने पळवले होते.

मूळ बातमी येथे वाचा – समा टीव्ही । अर्काइव्ह
फॅक्ट क्रेसेंडो हिंदी टीमने कराचीमधील गुलबर्गा येथील एसपीओशी संपर्क केला. हा व्हिडियो कराचीमधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, 26 ऑगस्ट रोजी येथील हिल भागातील गुलशन-ए-इकबाल येथी ही घटना घडली होती. चार मुलांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत एका जोडप्याला लुटले. या प्रकरणी दोघा जणांना पकडण्यात आले असून, त्यांची नावे युसूफ (17) आणि अरिब (15) असे आहे.
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, हा व्हिडियो मुंबईतील घाटकोपर भागातील नाही. भरदिवसा लुटमारीची ही घटना पाकिस्तानातील कराची शहरात 26 ऑगस्ट 2019 रोजी घडली होती. त्यामुळे पोस्टमधील दावा असत्य आहे.

Title:पाकिस्तानातील लुटमारीचा व्हिडियो मुंबईतील म्हणून केला जातोय व्हायरल. पाहा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
