राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या दौऱ्यामध्ये एका माजी दलित आमदारासोबत जेवणाच्या ताटावरून जातीभेद करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत वसुंधरा राजे जेवण करीत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये माजी आमदार डॉ. विश्वनाथ मेघवाल वगळता सर्वांना स्टीलच्या ताटामध्ये जेवण देण्यात आल्याचे दिसते. डॉ. मेघवाल यांच्या समोर मात्र पांढरी प्लेट दिसते. दावा केला जात आहे की, केवळ दलित असल्यामुळे डॉ. मेघवाल यांना ‘युज अँड थ्रो’ (डिस्पोजेबल) प्लेटमध्ये जेवण देण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा - फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

कार्यकर्त्यांसोबत वसुंधरा राजे जेवण करीत असल्याचा फोटो शेयर करून युजरने लिहिले की, राजस्थानच्या पूर्व मुख्यमंत्री वसुधंरा राजे दौऱ्यावर होत्या. शेडुल्ड कास्ट (SC) समाजातील एका आमदाराला साध्या (एक वेळ जेवण करून फेकून द्यायच्या) प्लेटमध्ये व इतर सर्वाना स्टीलच्या प्लेटमध्ये जेवायला वाढले.

तथ्य पडताळणी

फेसबुक पोस्टमधील फोटोमध्ये 26 ऑगस्ट 2019 अशी तारीख दिलेली आहे. तसेच हा फोटो वसुंधरा राजेंच्या राजकीय दौऱ्याचा असल्याचे म्हटले आहे. म्हणून वसुंधरा राजे यांच्या फेसबुक व ट्विटर पेजची तपासणी केली. त्यातून कळाले की, वसुंधरा राजे 26 ऑगस्ट (सोमवारी) रोजी बीकानेर-श्रीगंगानगरच्या दौऱ्यावर होत्या. त्यांच्या फेसबुक पेज व ट्विटवरून या दौऱ्याचे फोटो शेयर करण्यात आले आहेत.

26 ऑगस्ट रोजीच्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, आज बिकानेर जिल्ह्यातील धीरेरा गावात कार्यकर्ते आणि सामान्य जनतेशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या आग्रहाखातर आम्ही झाडाखाली बसून खाखरा आणि सांगरीचा साग अशा स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला. लोकांचे हे प्रेम पाहून मी भारावून गेले. (भाषांतर)

याबाबत अधिक शोध घेतल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमध्ये वसुंधरा राजेंच्या बाजूला बसलेले माजी आमदार डॉ. विश्वनाथ मेघवाल आहेत. खाजुवाला (बिकानेर) मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करायचे. त्यांनी राजस्थान सरकारतर्फे संसदीय सचिव म्हणूनदेखील काम केले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने थेट डॉ. विश्वनाथ मेघवाल यांच्याशी संपर्क साधला. वसुंधरा राजे किंवा इतरांनी त्यांच्यासोबत जातीभेद केल्याचे वृत्त साफ खोटं असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दिवशी काय नेमके काय झाले, फोटोत त्यांच्यासमोर पांढरी प्लेट का आहे याचा सविस्तर तपशील फॅक्ट क्रेसेंडोपाशी दिला. सोबत वेगवेगळ्या अँगलने घेतलेले फोटोसुद्धा पाठवले.

डॉ. विश्वनाथ मेघवाल यांचे स्पष्टीकरण

श्रीगंगानगरचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री निहालचंद मेघवाल यांच्या आईचे निधन झाल्यामुळे वसुंधरा राजे यांनी 26 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. तत्पूर्वी सुरतगड येथे दुपारचे जेवण करण्याचे नियोजन होते. रस्त्यावरील अनेक गावांमध्ये लोकांनी वसुंधरा राजेंचे स्वागत केले. लूणकरणसर तालुक्यातील धीरेरा गावात पोहचल्यानंतर तेथील लोकांनी जेवणाचा आग्रह केला. आधीच उशीर झाल्यामुळे आम्ही तेथे जेवण करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी अत्यंत वेगाने आणि प्रेमाने आमच्या जेवण्याची व्यवस्था केली. कोणताही तामझाम नाही. अचानक ठरल्यामुळे होईल तशी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे वेगवेगळे ताटं दिसतात. 

टेबलवर काळ्या रंगाच्या दोन व्हीआयपी खुर्ची लावण्यात आल्या. एकावर वसुंधरा राजे बसल्या तर दुसऱ्या खुर्चीवर त्यांनी मला बसविले. माझ्या उजव्या बाजूला वसुंधरा राजेंचा मुलगा खासदार दुष्यंत सिंह (निळा शर्ट) बसलेले होते. त्यांना साधी खुर्ची होती.

सुरुवातील मलासुद्धा स्टीलचे ताट देण्यात आले होते (फोटो क्र. 1 पाहा). परंतु, दिल्लीहून आलेल्या एका पाहुण्याला मी माझे ताट दिले. आणि मग मला चायना क्रॉकरीचे ताट देण्यात आले. माझ्यासमोर जी पांढरी प्लेट दिसतेय ती डिस्पोजेबल किंवा युज अँड थ्रो प्लेट नाही. चीनीमाती पासून बनवलेली ती प्लेट आहे. बरं केवळ मलाच क्रॉकरीचे ताट दिले होते असे नाही. नोखाचे विद्यमान आमदार बिहारीलाल बिश्नोई यांच्यासमोरसुद्धा पांढरी क्रॉकरीचे ताट दिसते (फोटो क्र. 2 पाहा). नीट लक्ष दिले तर वसुंधरा राजेंच्या प्लेटमध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाच्या वाट्या दिसतात. त्या याच क्रॉकरी सेटमधील आहेत. त्यामुळे मला मुद्दामहून वेगळे ताट देऊन जातीभेद करण्याचा दावा चूकीचा आहे.

निष्कर्ष

वसंधुरा राजे यांच्या दौऱ्यामध्ये माजी आमदार डॉ. विश्वनाथ मेघवाल यांच्यासोबत जेवणाच्या ताटावरून जातीभेद झाल्याचे वृत्त खोटं असल्याचे खुद्द डॉ. मेघवाल यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले. फोटोत दिसणारी पांढरी प्लेट मूळात चायन क्रॉकरी आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:वसुंधरा राजेंच्या कार्यक्रमात माजी दलित आमदारासोबत जेवणाच्या ताटावरून जातीभेद करण्यात आला का?

Fact Check By: Agastya Deokar

Result: False