
सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून होणारा दुधपुरवठा महापुरामुळे विस्कळित झालेला असतानाच ‘महापुरा मुळे दुध पुरवठातिल कमतरता दुर करण्यासाठी हे महाशय दुधाची पुर्तता करायला पुरातल घाण पाणी कॅन मध्ये टाकत आहे, असा एक व्हिडिओ आम्ही वसई विरारकर या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
राज्यात दुधात भेसळीचा प्रकार नुकताच उघड झाला आहे का? याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी अशी घटना पाथर्डी परिसरात घडल्याचे वृत्त जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने 26 जून रोजी दिल्याचे दिसून आले. सांगली आणि कोल्हापूर परिसरात आलेल्या महापूरानंतर असे वृत्त कोणत्याही वृत्तवाहिनीने अथवा वृत्तपत्राने दिल्याचे मात्र दिसून आले नाही. अन्न आणि औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावरही याबाबत कोणतेही वृत्त दिसून आले नाही. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. आम्ही या व्हिडिओतील वेगवेगळी दृश्ये घेऊन ती रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम दिसून आला.
या परिणामातील विविध ट्विटर खात्यांना आम्ही भेट दिली. त्यावेळी हा व्हिडिओ मे 2019 मधील असल्याचे दिसून आले. यातील एक ट्विट आपण खाली पाहू शकता.
या ट्विटमधील भाषा कोणती आहे हे आम्ही भाषातज्ञांच्या मदतीने जाणून घेतले. त्यावेळी ही भाषा पोतुर्गीज असल्याचे दिसून आले. जगातील प्रमुख भाषांपैकी ही एक भाषा आहे. या ट्विटमध्ये हा व्हिडिओ ब्राझीलमधील असल्याचे म्हटले आहे. पोतुर्गीज ही ब्राझीलची अधिकृत भाषा आहे.
निष्कर्ष
दुध भेसळीची ही घटना महाराष्ट्रातील नसून ब्राझीलमधील आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुरपरिस्थितीचा या व्हिडिओ कोणताही संबंध नाही. पुरपरिस्थितीचा फटका मुंबईला आणि अन्य महानगरांना बसला असला तरी दुध भेसळीची अशी घटना उघडकीस आलेली नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : महापुरामुळे दुधात भेसळीचा हा प्रकार घडत आहे का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
