
बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदींचा मुखवटा लावून आलेल्या एका भाजप उमेदवाराला जनतेने हाकलून लावले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. सदरील व्हायरल व्हिडिओ बिहारचा नसून, मध्यप्रदेशचा आहे.
काय आहे दावा?
सुमारे एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुखवटा घातलेल्या एका व्यक्तीला संतप्त गर्दी त्वेषाने निघून जाण्यास सांगत आहे. तो व्यक्ती बाहेर पडत असताना काही जण भाजपविरोधी घोषणाबाजी करीत त्याला धक्काबुक्कीसुद्धा करतात.
सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “मोदीचा मुखवटा घालतो काय? बिहारमध्ये भाजप उमेदवाराला हाकलून दिले. सगळ्यांना यांची लायकी कळाली. लवकरच सगळीकडे हे दृश्य बघायला मिळेल.”
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम हा व्हिडिओ कुठला आहे हे पाहुया. त्यातील की-फ्रेम्स निवडून सर्च केल्यावर भोपाल समाचार नामक वेबसाईट या व्हिडिओबाबत एक बातमी आढळली.
त्यानुसार, मध्यप्रदेशच्या इंदौर शहरातील ही घटना आहे. गांधी जयंतीच्या दिवशी (2 ऑक्टोबर) भाजपच्या एका कार्यकर्त्याने मोदींचा मुखवटा घालून महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले होते. यामुळे तेथे उपस्थित काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले.

मूळ बातमी येथे पाहा – भोपाल समाचार । अर्काइव्ह
मोदींचा मुखवटा घातलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव लक्ष्मीनारायण शर्मा असे आहे. गांधींच्या पुतळ्यासमोरच त्यांच्याशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा त्यांनी आरोप केला आहे. दैनिक भास्करच्या वेबसाईटवर याप्रकरणाचा व्हिडिओ उपलब्ध आहे. तसेच घटनेनंतर शर्मा यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रियासुद्धा यामध्ये आहे.
मूळ बातमी – दैनिक भास्कर । अर्काइव्ह
प्रकरणाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने इंदौरमधील तुकोगंज पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सत्येंद्र सिंह सिसोदिया यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, “सदरील व्हायरल व्हिडिओमधील घटना इंदौरच्या रिगल सिनेमाजवळी गांधी पुतळ्याजवळ घडली होती.”
यानंतर आम्ही लक्ष्मीनारायण शर्मा यांच्याशीसुद्धा संपर्क केला. ते म्हणाले की, “गांधी जयंतीच्या दिवशी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी वेशभूषा करून गांधी स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेलो होतो. तेथे मी कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्याशी बोललो किंवा काही घोषणासुद्धा दिल्या नाहीत. तरीदेखील त्यांनी माझ्याशी झटापट करून गांधींच्या पुतळ्यासमोरच हिंसा केली. या प्रकरणी मी तुकोगंज ठाण्यात कलम 323, 294 व 506 अंतर्गत गुन्हा नोंदविलेला आहे.”
फॅक्ट क्रेसेंडोपाशी शर्मा यांनी दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, मोदींचा मुखवटा घातलेल्या व्यक्तीला हाकलून देण्याचा तो व्हायरल व्हिडिओ बिहारमधील नाही. तसेच तो व्यक्ती भाजपचा बिहार विधानसभा उमेदवारसुद्धा नाही. हा व्हिडिओ मध्यप्रदेशमधील आहे. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील वादाचा हा व्हिडिओ आहे.

Title:मोदींचा मुखवटा घातलेल्या भाजप उमेदवाराला बिहारमध्ये हाकलून लावण्यात आले का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
