Fact : पश्चिम बंगालमध्ये नुकतीच मतपत्रिकेद्वारे नगरपालिकेची निवडणुक घेण्यात आलेली नाही

False राजकीय | Political

मोदींचा सुफडा साफ पश्चिम बंगाल.. वाचा सविस्तर..पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांनी बॅलेट पेपरने इलेक्शन झाले. 7 नगरपालिकांमध्ये 148 पैकी 140 जागा जिंकले. याला म्हणतात लोकशाहीची ताकद महाराष्ट्रात पण बँलेट पेपरने इलेक्शन व्हायलाच हवे अशी माहिती Pritam Wankhade यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

तृणमूल काँग्रेसने खरोखरच पश्चिम बंगालमध्ये झालेल्या 7 नगरपालिकांमध्ये 148 पैकी 140 जागा जिंकल्या आहेत का? पश्चिम बंगालमध्ये नुकतेच 7 नगरपालिकांसाठी मतदान झाले आहे का? याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी आम्हाला एनडीटीव्ही इंडियाचे सुमारे दोन वर्षापुर्वीचे म्हणजेच 17 मे 2017 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात नगरपालिकेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने घवघवीत यश मिळवले असल्याचे म्हटले आहे.

एनडीटीव्ही इंडिया / Archive

तृणमूल काँग्रेसने जर एवढा मोठा विजय मिळवला असेल तर त्याची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर निश्चितच असेल म्हणून आम्ही तृणमूल काँग्रेसच्या संकेतस्थळासही भेट दिली. त्याठिकाणी 19 मे 2017 रोजी देण्यात आलेला एक लेख दिसून आला. यात पालिका निवडणुकीत 2015 आणि 2010 मध्ये पक्षाला घवघवीत यश मिळवल्याचे म्हटले आहे. याशिवाय 2017 मध्ये पालिका निवडणुकीत पक्षाने घवघवीत यश मिळवल्याचे म्हटले आहे. या संकेतस्थळावर आम्हाला पक्षाने 7 नगरपालिकांमध्ये 148 पैकी 140 जागा जिंकल्याचे वृत्त कुठेही दिसून आले नाही.

तृणमूल काँग्रेसचे संकेतस्थळ / Archive 

निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरही हे निकाल आपल्याला पाहता येतात. पश्चिम बंगाल निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरही सध्या कोणतीही नगरपालिका निवडणुक सुरु असल्याची अधिसुचना अथवा निकाल दिसुन येत नाही. तृणमूल काँग्रेसच्या कोलकात्ता कार्यालयाशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सध्या कोणत्याही नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नसून असा कोणताही निकाल लागला नसल्याचे स्पष्ट केले. 

निष्कर्ष

पश्चिम बंगालमधील कोणत्याही नगरपालिकेचे निकाल नुकतेच लागलेले नाहीत. तृणमूल काँग्रेसने 7 नगरपालिकांमध्ये 148 पैकी 140 जागा जिंकल्याचा दावाही खोटा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact : पश्चिम बंगालमध्ये नुकतीच मतपत्रिकेद्वारे नगरपालिकेची निवडणुक घेण्यात आलेली नाही

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False