FACT CHECK: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या खासगी नोकरी करीत आहेत का?

False आंतरराष्ट्रीय

दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बराक ओबामांविषयी सोशल मीडियावर विविध दावे केले जातात. मध्यंतरी पोस्ट फिरत होत्या की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असूनही ते स्वतःचे घरसुद्धा करू शकले नाही. फॅक्ट क्रेसेंडोने हा दावा खोटा सिद्ध केला होता. आता म्हटले जात आहे की, बराक ओबामा राष्ट्राध्यपदावरून पायाउतार झाल्यावर खासगी नोकरी करीत आहेत. त्यांच्या या साधेपणाचे उदाहरण देत भारतातील नेत्यांच्या भरमसाठ संपत्तीसंचयावर बोचरी टीक केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुकवर शेयर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये बराक ओबामांचा हॉटेल काउंटरवरील एक फोटो दिसतो. सोबत लिहिले की, दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्रपती असणारे ओबामा आज प्रायव्हेट जॉब (खासगी नोकरी) करीत आहेत. भारतात तर सरपंचाच्या पण पाच पिढ्या बसून खातात.

तथ्य पडताळणी

बराक ओबामा यांना माजी राष्ट्राध्यक्ष म्हणून आजीवन दोन लाख डॉलर्सची पेन्शन मिळते. तसेच ते वकीलही आहेत. त्यामुळे ते खासगी नोकरी करीत असल्याचा दावा संशयास्पद वाटतो. फॅक्ट क्रेसेंडो सर्वप्रथम पोस्टमधील फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यातून ईटी ऑनलाईन वेबसाईटवरील 4 ऑगस्ट 2016 रोजीची एक बातमी आढळली. त्यानुसार, ओबामा यांची लहान मुलगी साशा हिने उन्हाळ्याच्या सुटीत नॅन्सीज नावाच्या एका रेस्ट्राँमध्ये काम केले होते. हॉटेल काउंटरवर ओबामा उभे असलेला फोटो या बातमीत दिलेला आहे. गेटी इमेजेसच्य सौजन्याने दिलेला हा फोटो नॅन्सी रेस्ट्राँ येथील असल्याचे म्हटले आहे.

हफिग्टंन पोस्ट नावाच्या वेबसाईटवरसुद्धा हा फोटो आढळला. त्याखाली दिलेल्या कॅप्शननुसार, बराक ओबामा यांनी 13 ऑगस्ट 2013 रोजी मॅसेच्युएट्सच्या ओक ब्लफ्स येथील नॅन्सीज् रेस्ट्राँ येथे भेट दिली होती. हा फोटो तेव्हाचा आहे. गेटीसाठी मॅथ्यू हिली-पूल या छायाचित्रकाराने हा फोटो काढला होता. याचाच अर्थ की, हा फोटो सहा वर्षांपूर्वीचा असून बराक ओबामा तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे हा फोटो त्यांच्या खासगी नोकरी करण्याचा नाही.

मूळ फोटो येथे पाहा – हफिग्टिंन पोस्टअर्काइव्ह

मग बराक ओबामा कार्याकाळ संपल्यानंतर काय करीत आहेत?

विविध वेबसाईट्सवरील बातम्या आणि ओबामा यांच्या मुलाखातीतून हे स्पष्ट होते की, ते नोकरी करीत नाहीत. बराक ओबामा यांचा कार्यकाळ 2017 साली संपुष्टात आला. वयाच्या 55 व्या वर्षी ते व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले. अमेरिकेत एक व्यक्ती जास्तीतजास्त दोन वेळाच राष्ट्रपती होऊ शकतो. त्यानंतर तो पुन्हा सक्रीय राजकारणात येऊ शकत नाही. त्यामुळे पत्नी मिशेलसह ते सार्वजनिक जीवनात विविध उपक्रम आणि प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत. भावी राजकीय पीढी घडविण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. 2017 नंतर खालीलप्रमाणे आपला वेळ सत्कारणी लावत आहेत.

1. लेखक

बराक ओबामा यांची “The Audacity of Hope”, “To Thee I Sing” आण “Dreams From My Father”  तीन पुस्तके तुफान लोकप्रिय आहेत. राष्ट्राध्यपदावरून पायाउतार झाल्यानंतर ओबामा यांनी आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना प्रकाशकाकडून 60 मिलियन डॉलर्सची ऑफर देण्यात आली. (संदर्भः बिझनेस इनसाईडर)

2. चित्रपट आणि माहितीपट

बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी ऑनलाईट स्ट्रीमिंग सर्व्हिस नेटफ्लिक्ससोबत करार करून विविध चित्रपट आणि माहितीपट बनिवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी हायर ग्राऊंड प्रोडक्शन्स नावाची कंपनीसुद्धा स्थापन केली. त्याअंतर्गत अमेरिकन फॅक्टरी (माहितीपट), ब्लूम (सिरीज), फ्रेडरीक डग्लस यांच्यावर आत्मचरित्रपट, लहान मुलांसाठी लिसन टू युवर व्हेजिटेबल्स अँड इट युवर पॅरेंट्स या विविध इतरही अनेक प्रोजेक्टस तयार करण्यात येणार आहेत. (संदर्भः नेटफ्लिक्स प्रेस रिलीज)

3. वक्ता

बराक ओबामा यांना विविध देश, संस्था, विद्यापीठे, विद्यार्थी संमेलने येथे भाषण देण्यासाठी बोलविण्यात येते. यातूनही त्यांची रग्गड कमाई होते. बराक ओबामा यांची सध्याची संपत्ती 40 मिलियन डॉलर्स एवढी आहे. 

ओबामा यांनी कार्यकाळ संपत आला तेव्हा विनोद म्हणून म्युझिक स्ट्रीमिंग कंपनी स्पॉटीफायमध्ये नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर कंपनीनेसुद्धा “प्रेझिडेंट ऑफ द प्लेलिस्ट” नावाची जागा तयार केली होती. कंपनीचा संस्थापक डॅनियल एक याने ओबामांना ट्विटरवरून खुली ऑफरसुद्धा दिली होती. परंतु, हा सगळा केवळ एक विनोद होता. 

निष्कर्ष

राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर बराक ओबामा खासगी नोकरी करीत नाहीत. ते सामाजिक कार्य, लिखाण, भाषणे अशा विविध पद्धतीने आयुष्य व्यतीत करीत आहेत. पोस्टमध्ये दिलेला फोटो 2013 सालातील असून त्यावेळी ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:FACT CHECK: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या खासगी नोकरी करीत आहेत का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False