
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ‘फडतूस गृहमंत्री’ म्हणून हेटाळणी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला.
शिंदे गटाच्या महिलांनी कार्यकर्त्यांनी ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना कथितरीत्या मारहाण केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर थेट इशारा दिला की, “या पुढे देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललात, तर तुम्हाला सोडणार नाही. याला धमकी समजा.”
या पार्श्वभूमीवर ‘सरकारनामा’ आणि ‘एबीपी माझा’ या दोन्ही वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंची माफी मागितली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हे दोन्ही ग्राफिककार्ड बनावट आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितलेली.
काय आहे दावा ?
चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो आणि ‘सरकारनामा’ वेबसाईटचा लोगो असणाऱ्या ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या विधानाबद्दल मी माफ मागून मी माझे शब्द माघारी घेतो, तसेच उद्धव ठाकरे व तमाम शिवसैनिकांचा भावना दुखवण्याचा हेतू नव्हता तरी देखील मी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो.”

मूळ पोस्ट – फेसबुक
‘एबीपी माझा’ वेबसाईटचा लोगो असणाऱ्या ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या विधानाबद्दल मी माफ मागून मी माझे शब्द माघारी घेतो.”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
सध्या ठाकरे गट आणि भाजप यांच्यात तापलेल्या राजकीय वातावरणात बावनकुळेंच्या माफीची नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही खात्रीदायक बातमी सापडली नाही.
‘सरकारनामा’ आणि ‘एबीपी माझा’ या दोन्ही वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरसुद्धा हे ग्राफिक आढळले नाही.
याउलट ‘सरकारनामा’ आणि ‘एबीपी माझाच्या’ ग्राफिक कार्डची निरीक्षण केल्यावर कळाले की, ते व्हायरल ग्राफिक कार्ड पेक्षा वेगळे आहे. ते दोन्ही पोस्ट आपण खाली पाहू शकतात.
सरकारनामा –

एबीपी माझा –
‘
सरकारनामा’च्या सोशल मीडिया प्रमुख समृद्धा भांबुरे यांनी सांगितले की, सरकारनामामध्ये वापरला जाणारा फाँट आणि व्हायरल ग्राफिकमधील फाँट वेगळा आहे. बावनकुळे यांनी माफी मागितल्याची सरकारनामाने कोणतीही बातमी दिलेली नाही. ते बनावट ग्राफिक आहे.
तसेच ‘एबीपी माझा’चे सोशल मीडिया प्रमुख मेघराज पाटील यांनी सांगितले की, ‘एबीपी माझा’ने अशी कोणती ही बातमी शेअर केली नाही.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की, ‘सरकारनामा’ आपल्या ग्राफिक कार्डमध्ये नेहमी राईट अलाईनमेंट (उजव्या बाजूने) असते. परंतु, व्हायरल पोस्टमधील मजकूर सेंट्रल अलाईनमेंटमध्ये आहे.
सरकारनामाचे इतर पोस्ट आपण इथे पाहू शकतात.

निष्कर्ष
यावरून सिद्ध होत की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने खोटे विधान व्हायरल होत आहे. सरकारनामा आणि एबीपी माझाचे लोगो लावून फेक ग्राफिक तयार करण्यात आले आहेत. बावनकुळे यांनी ठाकरेंची माफी मागितलेली नाही
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:चंद्रकांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंची माफी मागितल्याच्या खोट्या पोस्ट व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
