
महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेळीपालन करणाऱ्यांमध्ये सध्या एका व्हिडिओमुळे चिंता आहे. राजस्थानमध्ये शेळ्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या म्हणून एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. ही बाब सत्य आहे की अफवा याबाबतची विचारणाही अनेकांकडून करण्यात येत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत एकनाथ कराड यांनी राजस्थानमधील अजमेर येथे शेळ्यांना महामारीची लागण झाल्याचे म्हटले आहे तर रशीद अहमद चौधरी यांनी हा कोरोना व्हायरसचा कहर असल्याचे म्हटले आहे. हा खरोखरच कोरोना विषाणूचा कहर आहे का? राजस्थानमध्ये शेळ्यांना कोरोनाची लागण झाली आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
राजस्थानमध्ये खरोखरच शेळ्यामध्ये कोरोनाची लागण झाली आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम इनविडच्या साहाय्याने हा व्हिडिओ शोधला. हा व्हिडिओ सर्वप्रथम आफताब नवाब यांनी 11 डिसेंबर 2019 रोजी अपलोड केला असल्याचे दिसून आले. हा संपूर्ण व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण हा दक्षिण भारतातील केरळ या राज्यात 30 जानेवारी 2020 रोजी चाचणीत सकारात्मक आढळून आला. शेळ्याचा व्हिडिओ हा त्यापुर्वीचा असल्याचेही यातून स्पष्ट होत आहे.
बीबीसीच्या संकेतस्थळावरील वृत्त / Archive
भारत सरकारच्या पत्र सुचना कार्यालयानेही 30 जानेवारी 2020 रोजी एका ट्विटद्वारे भारतात केरळमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळल्याचे म्हटले असल्याचे आपण खाली पाहू शकतो.
त्यानंतर पत्रिका या संकेतस्थळाने दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. राजस्थानच्या पशुपालन विभागाने हा व्हिडिओ असत्य माहिती देणारा आणि शेळीपालन करणाऱ्याचे नुकसान करणारा असल्याचे स्पष्ट केले. राजस्थानमधील शेळ्यांमध्ये कोणताही रोग पसरलेला नसल्याचेही विभागाने स्पष्ट केले. कोरोनाच्या नावाखाली काही जण शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी अशी माहिती पसरवत असल्याचे यातून दिसून येत असल्याचे या संकेतस्थळाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
पत्रिका संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive
निष्कर्ष
राजस्थानमधील शेळ्यांना कोरोना अथवा अन्य कोणत्याही रोगाची लागण झालेली नाही. शेतकऱ्यांचे नुकसान करणारी ही माहिती असत्य असल्याचेही राजस्थानच्या पशुपालन विभागाने स्पष्ट केले आहे.

Title:राजस्थानमध्ये शेळ्यांना कोरोनाची लागण झाली आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
