
पश्चिम बंगालमधील खासदार नुसरत जहां नेहमीच चर्चेत राहतात. सध्या त्यांच्या नावाने एक व्हिडियो चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला दुर्गा मातेसमोर पारंपरिक धुनूची नृत्य करताना दिसते. ही महिला दुसरी कोणी नसून, खुद्द नुसरत जहां आहेत, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली.
हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
खासदार नुसरत यांनी असे नृत्य केल्याचा कोणताही व्हिडियो इंटरनेटवर आढळला नाही. त्यामुळे या व्हिडियोमध्ये नृत्य करणारी महिला कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आम्ही हा व्हिडियो पश्चिम बंगालमधील काही लोकांना पाठवला. त्यांनी ही महिला प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रिताबरी चक्रवर्ती असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले.
हा धागा पकडून मग आम्ही रिताबरी चक्रवर्तीचा शोध घेतला. तिच्या फेसबुक अकाउंटवर तिने काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोतील वेशभूषा आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडियोतील महिलेची वेशभूषा सारखीच असल्याचे लक्षात येते. खाली दिलेला फोटो ‘पाँड्स पुजोर नंदिनी 2019’ या सौंदर्य स्पर्धेतील आहे.
मग आम्ही पाँड्स पुजोर स्पर्धेविषयी तपास केला. या स्पर्धेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रिताबरीचा एक फोटो सापडला. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, बालीगंज कल्चरल असोसिएशनच्या स्टॉलवर रिताबरी आली होती. या फोटोतही तिने तशीच लाल रंगाची साडी घातलेली आहे.
बालीगंज कल्चरल असोसिएशन हा कोलकातामधील एक प्रतिष्ठित क्लब आहे. 1951 साली स्थापन झालेल्या या क्लबतर्फे दरवर्षी दुर्गा पूजेचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या दुर्गा पूजेला बंगाली अभिनेत्री रिताबीर चक्रवर्तीने हजेरी लावली होती. यावेळी तिने केलेल्या धुनूची नृत्याचा व्हिडियो बालीगंज कल्चरल असोसिएशनच्या अधिकृत फेसबुक पेजवरून 9 ऑक्टोबर रोजी शेयर करण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता की, व्हायरल होत असलेलील क्लिप याच कार्यक्रमातील आहे.
मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसुबक
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडियोमध्ये दुर्गा मातेसमोर नृत्य करणारी महिला खासदार नुसरत जहां नाहीत. मूळात तो व्हिडियो बंगाली अभिनेत्री रिताबरी चक्रवर्ती हिचा आहे. कोलकाता येथील बालीगंज कल्चरल असोसिएशनच्या दुर्गा पुजेदरम्यान तिने हे धुनूची नृत्य केले होते. त्यामुळे सदरील पोस्ट खोटी आहे.

Title:FACT CHECK: दुर्गा पुजेत नृत्य करणारी ही महिला तृणमूलची खासदार नुसरत जहां आहे का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
