FACT CHECK: जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जीना आणि शेख अब्दुल्ला हे सावत्र भाऊ होते का?

False राजकीय | Political

तुम्हाला माहित आहे का की, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जीना आणि काश्मीरचे मुख्यमंत्री शेख मोहम्मद अब्दुल्ला हे एकमेकांचे सावत्र भाऊ होते? या तिघांचे वडिल मोतीलाल नेहरू होते? सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका मेसेजमध्ये हा “कथितरीत्या सत्य” इतिहास पसरविला जात आहे. अनेकजण याला खरं मानून शेयरदेखील करीत आहेत.

मेसेजमध्ये नेहरू कुटुंबाविषयी अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. जसे की, मोतीलाल नेहरूंच्या पाच पत्नी होत्या, नेहरूंचे खरे वडिल मुबारक अली होते, इंदिरा गांधीच्या पतीचे खरे नाव जहांगीर फिरोज खान होते. हा सगळा इतिहास सर्वसामान्यांपासून लपविण्यात आला होता. वगैरे वगैरे. 

मग ही सगळी माहिती आली कुठुन? 

हा सगळा इतिहास बाहेर आणला तो जवाहरलाल नेहरू यांचे वैयक्तिक सहाय्यक एम. ओ. मथाई यांनी. त्यांनी चरित्राद्वारे नेहरू कुटुंबाचे सत्य जगासमोर आणले, असे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर गेल्या अनेक वर्षांपासून हा दावा करण्यात येत असल्याचे आढळले. अगदी 2013 पासून वेगवेगळ्या भाषेतून वरीलप्रमाणे माहिती आपण वाचू शकता. पोस्टमध्ये करण्यात आलेले दावे एम. ओ. मथाई यांनी खरंच केले का याचा शोध घेतला. 

मथाई यांनी 1946 ते 1959 दरम्यान पं. जवाहरलाल नेहरू यांचे खासगी सचिव म्हणून काम केले होते. परंतु, हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना राजीनामा द्यावा लागला. मथाई यांनी Reminiscences of the Nehru Age (1978) आणि My Days with Nehru (1979) ही दोन आत्मचरित्रे लिहिली. ही दोन्ही पुस्तके वादग्रस्त ठरली होती. या पुस्तकांमध्ये सदरील पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा करण्यात आला का हे तपासण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने या दोन्ही पुस्तकांचा अभ्यास केला.

मूळ पुस्तक येथे वाचा – Reminiscences of the Nehru Age (1978) | My Days with Nehru (1979)

मथाई यांनी Reminiscences of the Nehru Age पुस्तकाच्या प्रस्तावनेतच स्पष्ट केले आहे की, हा काही इतिहास किंवा चरित्रग्रंथ नाही. त्यांच्या स्मृतितील आठवणींच्या आधारे त्यांनी हा लिखाणप्रपंच केला आहे. हेच सूत्र त्यांनी My Days with Nehru च्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. दोन्ही पुस्तकांच्या अभ्यासाअंती कळाले की, मथाई यांनी मोतीलाल नेहरू यांच्या पाच पत्नी किंवा नेहरू, जीना आणि अब्दुल्ला शेख सावत्र भाऊ असल्याचा कोणाताही दावा केलेला नाही.

दोन्ही पुस्तकांमध्ये थुसू रहमान बाई किंवा मुबारक अली या दोन नावांचा उल्लेखसुद्धा नाही. मोतीलाल नेहरूंविषयीदेखील मथाई यांनी काहीच आक्षेपार्ह लिहिलेले नाही. विशेष म्हणजे फिरोज गांधी आणि शेख अब्दुल्ला यांच्याविषयी वेगवेगळे प्रकरण लिहिलेले आहे. त्यामध्येसुद्धा फिरोज गांधी यांनी खान हे आडनाव बदलून गांधी स्वीकारले किंवा ते मुस्लीम होते असे म्हटलेले नाही. फिरोज गांधी हे पारसी असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. नेहरू कुटुंबियांना इंदिरा-फिरोजच्या लग्नाला विरोध होता, परंतु, मुलीच्या आग्रहापुढे नेहरूंचे काही चालले नाही, असे त्यांनी लिहिलेले आहे. अधिक माहितीसाठी शशी भूषण लिखित Feroze Gandhi हे पुस्तक वाचा.

My Days with Nehru मध्ये पान क्र. 234 वर मथाई लिहितात की, नॅशनल कॉन्फरन्स स्थापन केल्यानंतर शेख अब्दुल्ला प्रथम नेहरूंच्या संपर्कात आले. काश्मीरप्रश्नी अब्दुल्ला यांचा जीनांवर विश्वास नव्हता. त्यांना नेहरूंची धर्मनिरपेक्ष धोरणांचे आकर्षण होते. संपूर्ण प्रकारणात मथाई यांनी कुठेही नेहरू आणि अब्दुल्ला यांना सावत्र भाऊ म्हटलेले नाही. 

याचा अर्थ की, मोतीलाल व नेहरू कुटंबांविषयी यांच्या विषयाचे आक्षेपार्ह दावे मथाई यांनी केलेले नाही. त्यांच्या दोन्ही चरित्रांमध्ये पोस्टमधील दावे करण्यात आलेले नाही. मग या व्हायरल मेसेजमधील दाव्यांमध्ये किती सत्य आहे?

जवाहरलाल नेहरूंचे वडिल कोण?

पोस्टमध्ये म्हटले की, जवाहरलाल नेहरूंच्या खऱ्या आईवडिलांचे नाव थुसू रहमान बाई आणि मुबारक अली आहे. अली यांच्या मृत्यूनंतर मोतीलाल यांनी थुसू रहमान बाई यांच्याशी विवाह केला. मोतीलाल यांचा हा दुसरा विवाह होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव स्वरूपाराणी होते. म्हणजे मोतीलाल हे जवाहरलाल यांचे सावत्र वडिल होते. 

परंतु, मोतीलाल नेहरूंविषयी उपलब्ध असणाऱ्या विविध पुस्तकांचा अभ्यास केला असता कळते की, सत्य वेगळेच आहे. 

बी. आर. नंदा लिखित The Nehrus: Motilal and Jawaharlal (1963) या चरित्रग्रंथानुसार, मोतीलाल नेहरू यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते. ते काश्मीर ब्राह्मण होते. शेवटचा मुघल सम्राट बहादुर शहा द्वितीय यांच्या दरबाराते ते दिल्लीचे कोतवाल होते. परंतु, 1857 च्या उठावानंतर गंगाधर यांची नोकरी गेली आणि ते आग्रा येथे स्थायिक झाले. 1861 साली त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी 6 मे 1861 रोजी मोतीलाल यांचा जन्म झाला. 

मोतीलाल यांचा कुमार वयातच पहिला विवाह झाला होता. पण, मुलाला जन्म देते वेळी बाळ आणि त्यांची पहिली पत्नी दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मोतीलाल यांनी स्वरूप राणी थुसू यांच्याशी लग्न केले. स्वरूपराणी यादेखील काश्मीरी ब्राह्मण होत्या. मोतीलाल आणि स्वरुपराणी यांना 14 नोव्हेंबर 1889 रोजी मुलगा झाला. तो मुलगा म्हणजे जवाहरलाल नेहरू. पुढे त्यांना विजयालक्ष्मी (1900) आणि कृष्णा (1907) या दोन मुली झाल्या.

याचा अर्थ की, मोतीलाल यांच्या दुसऱ्या पत्नीकडून तीन अपत्य झाले. त्यामुळे मोतीलाल हे जवाहरलाल यांचे सावत्र वडिल नाहीत. तसेच स्वरूपराणी या यांचा मुबारक अली यांच्याशी कधी विवाह झालाच नव्हता. अधिक संदर्भासाठी तुम्ही उपेंद्रचंद्र भट्टाचार्या आणि शोवेंदूसुंदर चक्रवर्ती संपादित Pandit Motilal Nehru: His Life and Work (1931) आणि विजयालक्ष्मी पंडित लिखित The Scope of Happiness : A Personal Memoir (1979) हा ग्रंथ वाचू शकता. यामध्ये कुठेही नेहरूंच्या पाच पत्नी होत्या अशी माहिती दिलेली नाही.

मग जीना आणि अब्दुल्ला यांच्याशी नेहरूंचा काय संबंध?

पोस्टमध्ये दावा केला की, मोतीलाल नेहरूंना चौथ्या पत्नीकडून मोहम्मद अली जीना आणि पाचव्या पत्नीकडून शेख अब्दुल्ला अशी दोन अपत्य झाली होती.

मोहम्मद अली जीना यांचा जन्म 1875 किंवा 1876 साली तर मोतीलाल नेहरू यांचा जन्म 1861 साली. म्हणजे जिना यांच्या जन्मावेळी मोतीलाल 14-15 वर्षांचे होते. अकबर अहमद लिखित Jinnah, Pakistan and Islamic Identity: The Search for Saladin पुस्तकानुसार, जीना यांच्या वडिलांचे नाव जिन्नाभाई पुंजा असे होते. ते गुजरातहून कराचीला स्थायिक झाले होते. जीना यांचे पुर्वज हिंदू होते. ते गुजरातमधील लोहाना समाजातील होते. परंतु, जीना यांच्या आजोबांना जातीतून बहिष्कृत केल्याने त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. याचा अर्थ की, मोतीलाल हे जीना यांचे वडिल नव्हते.

सईद तफाझुल्ल हुसैन लिखित Sheikh Abdullah-A Biography: The Crucial Period 1905-1939 चरित्रानुसार, शेख मोहम्मद अब्दुल्ला यांचा जन्म 5 डिसेंबर 1905 रोजी काश्मीरमधील सौरा गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव शेख मोहम्मद इब्राहिम होते. त्यांचा काश्मीरी शाल निर्माते आणि विक्रेते होते. त्यांच्या निधनानंतर द न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या बातमीत तसा उल्लेख आहे.

निष्कर्ष

मोतीलाल हेच जवाहरलाल नेहरू यांचे वडिल आहेत. मोहम्मद अली जीना आणि शेख अब्दुल्ला हे जवाहरलाल यांचे सावत्र भाऊ नाहीत. मोतीलाल यांचे पाच नाही तर दोन विवाह झाले होते. फिरोज गांधी यांचे खरे नाव जहांगीर संजय खान नाही. नेहरू कुटुंबियांची थोडक्यात माहिती खाली दिलेल्या फॅमिली ट्री मदून घेऊ शकता. शशी थरूर लिखित Nehru: The Invention of India (2003) पुस्तकात हा फॅमिली ट्री देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी भारत सरकारच्या नेहरू पोर्टलला आपण भेट देऊ शकता.

Avatar

Title:FACT CHECK: जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जीना आणि शेख अब्दुल्ला हे सावत्र भाऊ होते का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False