
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील एका मदरशामध्ये पोलिसांनी छापा मारून अवैध शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला होता. या घटनेची देशभरात चर्चा झाली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या इमारतीमध्ये बंदुका कशा व कुठून आल्या हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. या घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर मदरशातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र साठ्याचा फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. या फोटोमध्ये सोफ्यावर एके-47 बंदुकीसह आधुनिक पिस्तुले दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअॅपवर हा फोटो पाठवून (9049043487) याची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम कोणत्या मदरशातून शस्त्रास्त्र साठा जप्त करण्यात आला याची माहिती घेऊ. नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार, बिजनौर जिल्ह्यातील शेरकोट ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका मदरशामध्ये पोलिसांनी धाड घातली. यामध्ये पोलिसांना अवैध शस्त्रास्त्र मिळाली. बिजनौरचे सीओ कृपाशंकर कनौजिया यांनी माहिती दिली की, खबऱ्यांकडून मिळालेल्या टीपवरून हा छापा मारण्यात आला. याप्रकरणी मदरशाचा संचालक मोहम्मद साजिद, फहीम अहमद, जफर इस्लाम, सिकंदर अली, मोहम्मद शाहिद और अजीजुर्रहमान अशा 6 जणांना अटक करण्यात आली.

मूळ बातमी येथे वाचा – नवभारत टाईम्स
अमर उजालाच्या बातमीनुसार, शेरकोट येथील कंदला रोडवर स्थित दारुल कुरान हमीद मदरशात पोलिसांना 32 बोरचे एक पिस्तूल व त्याचे आठ काडतूस, तीन गावठी कट्टे व त्याचे 32 काडतूस आणि एक रिवॉल्व्हर व त्याचे 16 काडतूनस आढळून आले. बातमीमध्ये कुठेही म्हटले नाही की, मदरशामधून एके-47 सारखे आधुनिक शस्त्रास्त्र मिळाले.

मूळ बातमी येथे वाचा – अमर उजाला
इंडिया टीव्हीसह सर्व प्रमुख वाहिन्यांनी या घटनेची बातमी प्रसिद्ध केली. पोलिसांच्या छापेमारीचा व्हिडियोदेखील यामध्ये दाखविण्यात आला. मदरशामध्ये अवैध शस्त्रास्त्र लपविण्यात आल्याची पोलिसांनी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. शस्त्रास्त्रांसह एक गाडीदेखील पोलिसांनी जप्त केली. मदरशामध्ये असे शस्त्रास्त्र का जमा करण्यात आले होते, याचा तपास करीत आहेत. न्यूजबुलेटिनमध्येसुद्धा मदरशामध्ये एके-47 मिळाली असे सांगितलेले नाही.
बिजनौर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या कारवाईची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ठाण्याच्या प्रेसनोटनुसार, 10 जुलै रोजी टीपच्या आधारे पोलिसांनी शेरकोटमधील एका मदरशावर छापा मारला. यामध्ये 1 पिस्तुल, 4 गावठी कट्टे आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. प्रकरणी मदरसा संचाकलकासह 6 जणांना अटक करण्यात आली. ट्विटमध्ये अटकेतील संशयित आरोपी आणि जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा फोटोसुद्धा शेयर करण्यात आलेला आहे.
या कारवाईची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदसुद्धा घेतली होती. त्याचा व्हिडियोसुद्धा बिजनौर पोलिसांनी ट्विटरवर शेयर केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्येसुद्धा त्यांनी मदरशामधून आधुनिक एके-47 रायफल मिळाल्याची माहिती दिलेली नाही.
बिजनौर पोलिसांनी जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांच्या फोटो खाली दिला आहे. यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला एके-47 रायफलचा फोटो शेरकोट येथील मदरशातमध्ये पोलिसांनी छापा मारून जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांचा नाही.

मग या एके-47 रायफल्सचा फोटो कुठला आहे?
गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हा फोटो टम्बलर नावाच्या ब्लॉगसाईटवर आढळला. माय फर्स्ट लव्ह वॉज ए गन नावाच्या युजरने 3 मार्च 2019 रोजी हा फोटो ब्लॉगमध्ये पोस्ट केला होता. या ब्लॉगमध्ये विविध प्रकारच्या बंदुकींचे फोटो शेयर केलेले आहेत. म्हणजे हा फोटो चार महिन्यांपूर्वीपासून इंटरनेटवर उपलब्ध असून त्याचा आणि मदरशामध्ये मिळालेल्या शस्त्रास्त्रांचा काहीएक संबंध नाही.

मूळ ब्लॉगला येथे भेट द्या – टम्बलर
निष्कर्ष
उत्तरप्रदेशमधील बिजनौरच्या मदरशामधून 1 पिस्तुल, 4 गावठी कट्टे आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. परंतु, पोस्टमध्ये दिलेला फोटो एके-47 रायफल्सचा असून, त्याचा मदरशातील छाप्याशी काही संबंध नाही. तो चार महिन्यांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:हा फोटो बिजनौर मदरशातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा नाही. वाचा सत्य काय आहे.
Fact Check By: Agastya DeokarResult: False
