
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प येत्या पाच जुलै रोजी मांडण्यात येणार आहे. देशाची अर्थव्यवस्था नियंत्रणात आणून तिला चालना देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यासंबंधी मार्गदर्शन घेण्यासाठी मोदी यांनी माजी पंतप्रधान आणि जगप्रसिद्ध अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांची घरी जाऊन भेट घेतल्याचा एक व्हिडियो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीसुद्धा मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. मोदींच्या या “कथित” भेटीबाबत अनेक तर्क लढविले जात आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
फेसबुकवर 52 सेंकदाचा एक व्हिडियो शेयर करण्यात येतोय. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काळ्या रंगाच्या कारमधून येताना दिसतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरशरण कौर त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत. मोदी पुष्पगुच्छ देऊन सिंग यांची भेट घेतात आणि तिघे घरात जातात. युजरने व्हिडियोला कॅप्शन दिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची घरी जाऊन भेट घेतली. देशाची बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारणा करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंग यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
तथ्य पडताळणी
व्हिडियोची सत्यता पडताळण्यासाठी की-फ्रेम निवडणून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून इंडियन एक्सप्रेसने 27 मे 2014 रोजी प्रसिद्ध केलेली एक बातमी समोर आली. त्यानुसार, मोदींनी पंतप्रधानपदाची प्रथम शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी (27 मे 2014) मनमोहन सिंग यांची घरी जाऊन भेटी घेतली होती. यावेळी सिंग यांच्या पत्नीदेखील उपस्थित होत्या. ही केवळ औपचारिक भेट होती.

मूळ बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेस । अर्काइव्ह
एनडीटीव्ही चॅनेलवर या भेटीचा व्हिडियोदेखील उपलब्ध आहे. त्यांच्या युट्यूब अकाउंटवरून 27 मे 2014 रोजी तो अपलोड करण्यात आला होता. मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर सिंग यांच्या घरी औपचारिक भेट दिली होती. या भेटीचा आणि येणाऱ्या अर्थसंकल्पाचा काही एक संबंध नाही. मूळ व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनदेखील या भेटीचा फोटो शेयर करण्यात आला होता. हे ट्विट तुम्ही खाली पाहू शकता.
निष्कर्ष
पोस्टमधील व्हिडियो पाच वर्षांपूर्वीचा आहे. पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी 27 मे 2014 रोजी मनमोहन सिंग यांची घरी जाऊन औपचारिक भेट घेतली होती. हा जूना व्हिडियो सध्या चुकीच्या दाव्यासह फिरवला जात आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:VIDEO: आगामी अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांची भेट घेतली का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
