
रक्तबंबाळ अवस्थेतील बहिण-भावाचा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येतोय. व्हिडियोबाबत दावा केला जात आहे की, काही मुस्लिम तरुणांनी या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भावाने तिची रक्षा केली. त्यातून या बहिण-भावाला जबर मारहाण करण्यात आली. ही घटना उत्तर प्रदेशमधील इटौंजा येथील असल्याचे म्हटले आहे. या व्हिडियोच्या माध्यमातून हिंदु धर्मियांना वेळीच जागृत होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची तथ्य पडताळणी केली.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
फेसबुक वर 45 सेंकदाची ही क्लिप मोठ्या प्रमाणात पसरविली जात आहे. यामध्ये रक्ताने माखलेली बनियन घातलेला एक युवक आणि डोक्याला मार लागल्यामुळे शुद्ध हरपलेली एक मुलगी दिसते. हा युवक व्हिडियोत न दिसणाऱ्या काही लोकांशी या मारहाण प्रकरणी तक्रार दाखल करण्याची विनंती करत आहे. त्यावर ते लोक त्याला आधी या मुलीला दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगतात. तसेच त्यांना कोणी मारले असे विचारल्यावर युवक सांगतो की, इस्लाम आणि युनूस अशी नावे घेतो. मग ते लोक त्याला महींगवा चौकीवर एफआयआर देण्यास सांगतात.
व्हिडियोसोबत कॅप्शन देण्यात आले की, यह घटना इंटोजा थाना क्षेत्र की कल की है. शांतिप्रीय कोम के इस्लाम और चार पांच लोग इसकी बहन का रेप करने आए. इसने रेप नही करने दिया तो इसकी बहन और दोनों को बुरी तरह पीटा. जागो हिंदू जागो! आप लोगों का अंत निश्चित है और इस घटना में क्या पुलिस वाले इन्हें अस्पताल पहुंचा सकते थे. पर दुर्भाग्य देखिए हमारे देश के शासन का।
तथ्य पडताळणी
ही घटना उत्तर प्रदेशमधील इंटौंजा येथील असल्याची कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यानुसार गुगलवर – इटौंजा थाने मे भाई बहन – असे सर्च केले असता यासंबंधी विविध बातम्या समोर आल्या. अमर उजाला वेबसाईटवरील बातमीनुसार, सदरील युवकाचे नाव मोहम्मद शाहरुख खान आहे. हा युवक आपल्या जखमी बहिणीला घेऊन लखनऊच्या इटौंजा ठाण्याच्या महींगवा चौकीवर आला होता. कुटुंबाला झालेल्या मारहाणप्रकरणी त्याला तक्रार द्यायची होती. परंतु, तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला दवाखान्यात जाण्यास सांगून तक्रार घेतली नाही.

मूळ बातमी येथे वाचा – अमर उजाला
सदरील व्हिडियो सोशल मीडियावर फिरू लागल्यानंतर प्रशासनाला जाग आली. न्यूज-18 हिंदीने बातमी दिली की, या प्रकरणी राहुल नामक हवालदाराला बडतर्फ करण्यात आले. तसेच तक्रारदार युवक शाहरुखच्या कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी चार संशयितांना अटकसुद्धा करण्यात आली आहे.
लखनऊ पोलिसांच्या ट्विटर हँडलवरसुद्धा या व्हिडियोसंबंधी खुलासा करण्यात आला आहे. एका ट्विटर युजरने हा व्हिडियो शेयर करून जखमी तक्रारदारांना पोलिसांनी अशी वागणूक दिल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.
त्याची दखल घेत लखनऊ पोलिसांनी उत्तर दिले की, इटौंजा येथे घरासमोर खेळणाऱ्या युवकांमध्ये भांडण झाले. यावरून दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसन मारहाणीत झाले. हे दोन गट मुस्लिम समाजातीलच आहेत. या व्हिडियोमध्ये दिसणाऱ्या बहिण-भावाचे नाव शाहरुख आणि शबनम आहे. इटौंजा ठाण्यात या प्रकरणी रात्री 1.25 वाजता कलम 308, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उस्मान, शकील, युनुस, इस्लाम या चार जणांना अटक केली.
निष्कर्ष
पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, जखमी बहिण-भाऊ (शाहरुख आणि शबनम) मुस्लिम समाजातील असून बलात्कार करण्याच्या प्रयत्नातून त्यांना मारहाण झालेली नाही. घरासमोर खेळणाऱ्या मुलांच्या भांडणामुळे दोन गटात हाणामारी झाली. या व्हिडियोला सांप्रदायिक रंग देऊन पसरविले जात आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:VIDEO: जाणून घ्या या रक्तबंबाळ बहिण-भावाच्या व्हिडियोचे सत्य. विनाकारण दिला जातोय सांप्रदायिक रंग.
Fact Check By: Mayur DeokarResult: False
