
राजकारण गेलं चुलीत या फेसबुक पेजवरुन एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये 2014 च्या निवडणुक अर्जात त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता पदवीधर असल्याचे नमूद केल्याचे सांगण्यात येत आहे. इराणी यांनी 2019 च्या निवडणुक अर्जात आपली शैक्षणिक पात्रता 12 वी दर्शविल्याचेही सांगण्यात येत आहे.
तथ्य पडताळणी
स्मृती इराणी यांनी 2014 साली आपली शैक्षणिक पात्रता काय नमूद केली आहे. हे जाणून घेण्यासाठी आम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी 2014 साली झालेल्या निवडणूकीत आपली शैक्षणिक पात्रता बॅचलर ऑफ कॉमर्स पार्ट 1 अशी दिली असल्याचे आम्हाला दिसून आले. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुनही तुम्ही हे प्रतिज्ञापत्र पाहू शकता.
उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदारसंघातून स्मृती इराणी या निवडणूक लढविणार आहेत. सहा मे रोजी येथे मतदान होणार असल्याचे खाली दिलेल्या वेळापत्रकात दिसून येत आहे.
त्यानंतर आम्ही स्मृती इराणी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर गेलो. या ठिकाणी आम्हाला त्यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्याचा कोणताच फोटो दिसून आला नाही.
स्मृती इराणी यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरही आम्हाला याबाबतचे कोणतेही छायाचित्र आढळून आले नाही.
स्मृती इराणी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही त्यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्याचे अथवा प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे कोणतेही छायाचित्र दिसून आले आहे.
स्मृती इराणी यांनी अर्ज दाखल केला आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही अमेठीतील निवडणुकीचे वेळापत्रक जाणून घेतले. या वेळापत्रकानुसार स्पष्ट होते की त्यांनी अद्याप अर्जच दाखल केला नसून त्यामुळे प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रता नमूद करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे दिसून येते. खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही निवडणुक आयोगाचे अमेठी मतदारसंघाचे वेळापत्रक पाहू शकता.
निवडणुक आयोगाचे अमेठी मतदारसंघाचे वेळापत्रक / अक्राईव्ह लिंक
या वेळापत्रकात निवडणूकीची अधिसूचना 10 एप्रिल रोजी जारी होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यानंतर त्या अर्ज आणि प्रतिज्ञापत्र सादर करतील हे स्पष्ट आहे.
निष्कर्ष
स्मृती इराणी यांनी निवडणुक आयोगाला 2014 साली दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली शैक्षणिक पात्रता बॅचलर ऑफ कॉमर्स पार्ट 1 नमूद केली आहे. स्मृती इराणी यांनी 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अमेठीसाठी अद्याप (दि. 04 एप्रिल 2019, दुपारी 2 वाजून 45 मिनिटे) पर्यत आपला अर्ज सादर केला नसून आपली शैक्षणिक पात्रता 12 वी दर्शविणारे कोणतेही प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. त्यामुळे या व्हायरल होत असलेली पोस्ट ही संमिश्र स्वरुपाची आहे.

Title:सत्य पडताळणी : स्मृती इराणींनी 2019 च्या प्रतिज्ञापत्रात आपली शैक्षणिक पात्रता 12 वी दर्शवलीय?
Fact Check By: Dattatray GholapResult: Mixture
