Fact Check: पंतप्रधान मोदींनी देशाचे सोने विकल्याची कबुली दिली का? जाणून घ्या सत्य

False राजकीय | Political

सोशल मीडियावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक ग्राफिक व्हायरल होत आहे. या ग्राफिकमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, देशाची अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी भारताचे सोने विकले जात असल्याची कबुली पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्स आणि विरोधी पक्षांकडूनही भाजप सरकार देशाचे सोने विकत असल्याचा आरोप केला जात असल्याने या दाव्याची चर्चा वाढली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हायरल ग्राफिक आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांक (9049053770) वर पाठवून त्याची सत्यता पडताळून पाहण्याची विनंती केली.

पडताळणीत आढळले की, व्हायरल ग्राफिकमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नावाने जोडण्यात आलेले वक्तव्य बनावट आहे. त्यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही.

काय आहे दावा?

व्हायरल ग्राफिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यासोबत लिहिले आहे की, “या देशाचे सोने या देशातील लोकांच्या कामी येईल. सोने विकून देशाची अर्थव्यवस्था वाचवली जात आहे. जर असे केले नाही तर देशातील उद्योगपती उद्ध्वस्त होतील आणि जनतेला बेरोजगारीचा सामना करावा लागेल.”

हे ग्राफिक शेअर करत अनेक सोशल मीडिया युजर्स दावा करत आहेत की, पंतप्रधान मोदी यांनी स्वतः देशाचे सोने विकले जात असल्याचे मान्य केले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम, जर पंतप्रधान मोदी यांनी खरोखरच असे विधान केले असते, तर ती महत्त्वाची बातमी ठरली असती. मात्र, अशा आशयाची एकही बातमी कोणत्याही विश्वासार्ह वृत्तसंस्थेत किंवा अधिकृत माध्यमांनी दिल्याचे आढळून आले नाही.

व्हायरल ग्राफिकवर ‘नवभारत टाइम्स’चा (NBT) लोगो दिसत असला, तरी नवभारत टाइम्सच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा सोशल मीडिया हँडल्सवर असे कोणतेही ग्राफिक प्रकाशित झाल्याचे आढळले नाही.

यानंतर व्हायरल ग्राफिकला रिव्हर्स इमेज सर्च केले असता त्यातून हे ग्राफिक बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (डीजीआयपीआर) 4 जून रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर हेच ग्राफिक शेअर करून हे विधान फेटाळून लावले होते. 

डीजीआयपीआरने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, “सोशल मीडियावर प्रसारित होत असलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सोने विकण्याबाबत कोणतेही विधान केलेले नाही. त्यांनी केवळ परकीय चलन साठ्यावरचा ताण कमी करण्यासाठी काही काळ अनावश्यक सोन्याच्या खरेदीवर संयम ठेवण्याचे आवाहन केले होते.”

पीआयबी फॅक्ट चेकचे स्पष्टीकरण

भारतीय रिझर्व्ह बँकेने सुमारे 12 अब्ज डॉलर्सचे सोने विकल्याचा आणखी एक दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या दाव्याचे खंडन करत पीआयबी फॅक्ट चेकने 3 जून 2026 रोजी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर स्पष्टीकरण जारी केले.

पीआयबीने म्हटले की, आरबीआय आपल्या मासिक बुलेटिनमध्ये सोन्याच्या साठ्याची माहिती नियमितपणे प्रसिद्ध करते. उपलब्ध आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय चलन साठ्यातील सोन्याचा वाटा सप्टेंबर 2025 अखेरीस 13.92 टक्के होता. तो 31 मार्च 2026 पर्यंत वाढून 16.70 टक्के झाला, तर 22 मे 2026 रोजी तो आणखी वाढून 16.85 टक्क्यांवर पोहोचला.

निष्कर्ष

तपासणीतून स्पष्ट होते कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सोने विकण्याबाबत कोणतेही विधान केलेले नाही. व्हायरल ग्राफिकमधील दावा खोटा असून त्यांच्या नावाने दिशाभूल करणारे वक्तव्य सोशल मीडियावर पसरवले जात आहे.

(तुमच्याकडेही एखादा संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातमी असल्यास, ती फॅक्ट चेकसाठी आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांक 9049053770 वर पाठवा. तसेच, लेटेस्ट फॅक्ट चेक्स वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटरवर फॉलो करा.)

Result Stamp

Title: Fact Check: पंतप्रधान मोदींनी देशाचे सोने विकल्याची कबुली दिली का? जाणून घ्या सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *