
कारवर एके-47 बंदुकीने गोळीबार करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मर्सिडज बेंझ कंपनीच्या सीईओने स्वतः बुलेटप्रुफ कारमध्ये बसून गाडीची चाचणी केली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, बुलेटप्रुफ कारची चाचणी घेणारे मर्सिडिज बेंझचे सीईओ नव्हते.
काय आहे दावा?
व्हिडिओत दिसते की, काळ्या रंगाच्या मर्सिडिज कारमध्ये एक व्यक्ती बसल्यावर बाहेरून एक जण एके-47 बंदुकीने कारच्या पुढच्या काचेवर गोळ्या मारतो. परंतु, काच फुटत नाही.
सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “मर्सिडिजचे सीईओ स्वतः बुलेट प्रुफ कारची टेस्टिंग करताना. याला म्हणतात स्वतःच्या प्रोडक्टवरील विश्वास.”
मूळ पोस्ट – इन्स्टाग्राम
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम मूळ व्हिडिओ शोधला. कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ Texas Armoring Corporation (TAC) नावाच्या कंपनीचा आहे.
अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ही कंपनी बुलेटप्रुफ काच तयार करते. त्यांच्या युट्युब चॅनेलवर सदरील व्हिडिओ 2014 साली अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये कारवर 12 गोळ्या चालवण्यात येतात. गोळी चालविणाऱ्याचे नाव लॉरेन्स कोसुब आहे.
या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगण्यात आले की, कारमध्ये बसणारे व्यक्ती टीएसी कंपनीचे प्रेझिडेंट व सीईओ ट्रेंट किम्बल आहेत.
कंपनीच्या वेबसाईटवर ट्रेंट किम्बल यांच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे.
कंपनीच्या युट्युबवर कारच्या आतील बाजूने घेतलेला व्हिडिओसुद्धा आहे. तो तुम्ही येथे पाहू शकता.
टीएसी कंपनी कशाप्रकारे बुलेटप्रुफ काच तयार करते हे तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.
मर्सिडिज बेंझ कंपनीचे सीईओ कोण आहेत?
Ola Källenius 2019 पासून मर्सिडिज बेंझ कंपनीचे सीईओ आहेत. त्यापूर्वी 2006 ते 2019 दरम्यान Dr. Dieter Zetsche कंपनीचे सीईओ होते. म्हणजे सदरील व्हिडिओ चित्रित झाला होता तेव्हा Zetsche सीईओ होते आणि ते या व्हिडिओत नाहीत.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, मर्सिडिज बेंझ कंपनीच्या सीईओने स्वतः बुलेटप्रुफ कारची चाचणी घेतली नाही. टीएसी कंपनीचे सीईओ ट्रेंट केंबल हे कारमध्ये बसले होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:बुलेटप्रुफ कारची चाचणी करणारे ते मर्सिडज बेंझ कंपनीचे सीईओ नाहीत; वाचा काय आहे सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: Partly False
