
राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलेले असून आतापर्यंत पूरबळींची संख्या 89 झालेली आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भातील अनेक नद्या-नाले, तलाव भरून वाहत असून लाखो लोकांना पूराचा फटका बसलेला आहे.
अशाच एके ठिकाणच्या पूराच्या पाण्यात जीप वाहून जातानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ नांदेडमधील हिमायतनगर येथील आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ नांदेड किंवा महाराष्ट्रातील नाही. ही तर दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये घडलेली घटना आहे.
काय आहे दावा?
व्हायरल व्हिडिओत दिसते की, एका पूलावरून पूराचे पाणी वाहत असल्याने गाड्या उभ्या आहेत. एक जीप भरधाव वेगाने पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करते. परंतु, पाण्याचा वेग जास्त असल्याने ती प्रवाहात लोटली जाते.
या व्हिडिओसोबत कॅप्शन दिली आहे की, हिमायतनगर जवळील घटना. असे धाडस न करण्याचे लोकांना आवाहन केले जात आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक । फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
व्हिडिओची बारकाईने तपासणी केली असता त्यात बोलली जाणारी भाषा मराठी वाटत नाही. त्यामुळे हा व्हिडिओसोबत केलेला दावा संशयास्पद वाटतो.
व्हिडिओला फ्रेम-बाय-फ्रेम तपासणी केल्यावर जीपच्या मागे लागवलेल्या अतिरिक्त चाकाच्या कव्हरवर सुझूकी कंपनीचा लोगो आणि “Potohar 4WD” असे लिहिलेले दिसते.

गुगलवर याचा शोध घेतल्यावर कळाले की, Suzuki Potohar ही पाकिस्तानमधील जीप आहे. सुझूकी कंपनीने 1985 साली Potohar नावाचे मॉडेल पाकिस्तानमध्ये लाँच केले होते. 2006 साली हे मॉडेल बंद करण्यात आले.
हा धागा पकडून शोध घेतल्यावर कीवर्ड सर्चद्वारे युट्यूबवर पूरात जीप वाहून जाण्याचा हा व्हिडिओ पाकिस्तानातील म्हणून 2020 पासून उपलब्ध असल्याचे कळाले.
एका युजरने पाकिस्तानच्या बलोचिस्तानमधील एका गावातील हा व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे.
नांदेडमध्ये काय स्थिती आहे?
एबीपी न्यूजच्या बातमीनुसार, मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे या ठिकाणचा रस्ता बंद होऊन विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, पूरात जीप वाहून जाण्याचा व्हायरल व्हिडिओ एक तर दोन वर्षे जुना आणि पाकिस्तानातील आहे. ही घटना नांदेडच्या हिमायतनगर येथे घडल्याचा दावा खोटा आहे.
(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Title:पूरात जीप वाहून जाण्याचा ‘तो’ व्हिडिओ नांदेडचा नसून, पाकिस्तानातील आहे; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
