
डोंगरमाथ्यामधून कोरून तयार केलेल्या नव्या बोगद्याचा एक व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोकणातील कशेडी घाटातील असल्याचा दावा केला जात आहे. कोकणातील सर्वात मोठा बोगदा असे या व्हिडिओसोबत म्हटले जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रतील नसून, केरळमध्ये गेल्या वर्षी सुरू झालेला भुयारीमार्गाचा आहे.
काय आहे दावा?
दुचाकीस्वार बोगद्यामधून जातानाचा हा व्हिडिओ आहे. सोबत म्हटले आहे की, “कोकण कशेडी घाट बायपास. कोकणातील सर्वात मोठा भोगदा.”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम कशेडी घाटाविषयी माहिती घेतली असता या कशेडी घाटातील बोगद्याचे उद्घाटन अद्याप झाल्याची बातमी आढळली नाही.
व्हायरल व्हिडिओतील की-फ्रेम्सवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ केरळमधील बोगद्याचा आहे.
केरळमध्ये कुथिरन बोगद्याचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले. केरळच्या थ्रीसूर जिल्ह्यात हा भुयारीमार्ग आहे. तमिळनाडू आणि कर्नाटकला जोडणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 31 जुलै 2021 रोजी ट्विट करून कुथिरन बोगद्याच्या उद्घाटनाची माहिती दिली होती. सुमारे दीड किमी अंतराचा हा भुयारीमार्ग पिची अभयारण्यात जाणार आहे.
एकुण दोन बोगदे तयार करण्यात आलेले असून, दुसरा बोगदा गेल्या जानेवारी महिन्यात सुरू झालेला आहे.
व्हायरल व्हिडिओ कुथिरन बोगद्याचा आहे हे कशावरून?
व्हायरल व्हिडिओमध्ये सुरुवातील डाव्या बाजुला हिरव्या रंगाची एक पाटी दिसते आणि त्यापुढे एक लाल रंगाचे साईनपोस्ट आहे. कुथिरन बोगद्याबाहेरदेखील त्याच जागेवर ती निळी पाटी आणि लाल साईन पोस्ट आहे. निळ्या पाटीवर मल्याळम भाषेतून वाहनाचालकांनी बोगद्यामधून जाताना गाडीचे लाईट्स चालू ठेवावेत.
यावरून सिद्ध होते की, हा व्हिडिओ कुथिरन बोगद्याचाच आहे.

मूळ फोटो – युट्यूब
कशेडी घाटाचे काम कुठपर्यंत आले?
लोकसत्ताच्या सप्टेंबर 2020 मधील बातमीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून 2021 मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पोलादपूर (जि. रायगड) तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे उत्खनन सुरू होते. टीव्ही-9 मराठीच्या मार्च 2022 मधील बातमीनुसार, दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, केरळमधील भुयारीमार्गाचा व्हिडिओ महाराष्ट्रतील कशेडी घाटाचा म्हणून व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:व्हायरल व्हिडिओ कोकणातील कशेडी घाटाचा नाही; तो तर केरळमधील भूयारीमार्ग आहे
Fact Check By: Agastya DeokarResult: False
