
रक्ताने माखलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या दोन व्यक्तींचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून दावा केला जात आहे की, गौताळा अभयारण्यामध्ये वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ विदर्भामध्ये शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात जखमी झालेल्या लोकांचा आहे.
काय आहे दावा?
व्हायरल व्हिडिओमध्ये दोन जण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसतात. आसपास काही लोक त्यांना कुठे लागले हे पाहण्यासाठी एकाचा शर्टवर करतात. पोटावर गंभीर जखम दिसते. दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्याला मार लागलेला आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘गौताळा घाट,कन्नड,वाघाने हमला करून मोटरसायकल चालकांना घायाळ केले.’
व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे.

तथ्य पडताळणी
सर्वप्रथम आम्ही कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याला संपर्क साधला. गौताळा घाटामध्ये वाघाने हल्ला केल्याची कोणतीही घटना या भागात घडली नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर व्हिडिओतील कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले असता टीव्ही इंडिया नावाच्या पोर्टलवर सदरील व्हिडिओतील जखमी लोकांबाबत तीन आठवड्यांपूर्वीची एक बातमी आढळली. त्यानुसार, यवतमाळ जिल्हातील शिवर तांडा (ता. आर्णी) येथील दोन कुटुंबामध्ये शेतीच्या वादातून मारहाण झाली होती. यामध्ये दामासिंग चंदु राठोड,दारासिंग चंदू राठोड,विष्णू चंदु राठोड हे तीन भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते.
अधिक शोध घेतल्यावर ‘पत्रकार शक्ती’ नावाच्या युट्यूब चॅनेलवरील एक व्हिडिओ आढळला. व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती आणि युट्यूब चॅनेलच्या व्हिडिओतील व्यक्ती एकच आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने बातमीदार राजू चव्हाण व संपादक ओंकार चेके यांच्याशी संपर्क करून व्हिडिओची खातरजमा करून घेतली.
यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने पारवा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोरख चौधर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सदरील व्हायरल व्हिडिओ शिवर तांडा येथील असल्याचे सांगितले.
शेतीच्या वादासंदर्भात तक्रार देण्यासाठी राठोड कुटुंबिय पारवा पोलिस ठाण्याकडे जात असताना दुसऱ्या गटातील लोकांना त्यांच्यावर चिखलवर्धा (ता. घाटंजी) येथे धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये दामासिंग व विष्णू राठोड यांच्या डोक्याला मार लागला तर, दारासिंग यांच्या पोटामध्ये चाकूने वार करण्यात आले होते. उपचारांअंती सर्व जखमी घरी आलेले आहेत. आरोपींवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, सध्या ते अटकेत आहेत, अशी चौधर यांनी माहिती दिली.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, विदर्भातील शेतीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात जखमी लोकांचा व्हिडिओ मराठवाड्यात वाघाचा हल्ला म्हणून पसरविला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:शेतीच्या वादातील जखमींचा व्हिडिओ गौताळ्यात वाघाचा हल्ला म्हणून व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
