
राजस्थानमधील एका मंदिरात रोज रात्री काही बिबटे पुजाऱ्यासोबत झोपतात असा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पुजाऱ्यापाशी तीन-चार बिबटे त्यांच्याच अंथरुणात झोपताना दिसतात. हा व्हिडिओ राजस्थानमधील पिंपळेश्वर मंदिरातील असल्याचे म्हटले जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ भारतातील नाही.
काय आहे दावा?
सोशल मीडियावर एका व्यक्तीसोबत बिबटे झोपल्याचा व्हिडियो शेयर करून म्हटले आहे की, राजस्थानातील “सिरीहोलीनी” या गावातील पिंपळेश्वर मंदिरातील पुजाऱ्याजवळ रोज रात्री एका “बिबट्याचे कुटुंबच” येऊन झोपतं, अगदी त्या पुजाऱ्याच्या कुशीत. कसं ते पहा या विलक्षण व्हिडीयोत.”
मूळ पोस्ट – फेसबुक । आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हिडिओतील की-फ्रेमसवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर भारतीय वन खात्यातील अधिकारी प्रवीण कसवान यांनी 10 जून 2020 रोजी ट्विट केलेला हाच व्हिडिओ आढळला. सोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडियो डॉल्फ सी. वॉकर यांचा आहे.
हा धागा पकडून अधिक शोधल्यावर डॉल्फ सी. वॉकर यांचे अधिकृत युट्यूब चॅनेल सापडले. त्यावर हाच व्हिडिओ 7 मे 2020 रोजी शेयर केला होता. तो आपण खाली पाहू शकता.
डॉल्फ सी वॉकर हे प्राणीमित्र असून प्राणी हक्क व संवर्धनासाठी काम करतात. ‘चित्ता व्हिस्परर’ या नावाने प्रसिद्ध आहेत. प्राण्यांचा स्वभाव, वागणूक आणि वर्तन हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. दक्षिण अफ्रिकेत त्यांचे चिता फार्मसुद्धा आहे. तेथीलच हा व्हिडिओ आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ राजस्थानमधील पिंपळेश्वर मंदिरातील नाही तर दक्षिण आफ्रिकेतील आहे. तसेच व्हिडिओमध्ये बिबट्या नसून चित्ते आहेत.

Title:राजस्थानमध्ये पुजाऱ्यापाशी खरंच बिबटे येऊन झोपतात का? वाचा या व्हिडिओचे सत्य
Fact Check By: Milina PatilResult: False
