स्वित्झर्लंडमधील फुटबॉल प्रेक्षकांच्या भांडणाचा व्हिडिओ स्वीडनमधील दंगलीचा म्हणून व्हायरल

False आंतरराष्ट्रीय

स्वीडनच्या माल्मो शहरात गेल्या आठवड्यात दंगल उसळली होती. या दंगलीविषयी भारतीय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर एक जमाव दगड-काठ्यांनी हल्ला करीत असल्याचा एक व्हिडिओ पसरवून दावा केला जात आहे की, तो स्वीडनमधील दंगलीचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता कळाले की, हा व्हिडिओ 2018 साली स्वित्झर्लंडमध्ये फुटबॉल मॅचनंतर चाहत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा आहे. तो स्वीडनमधील नाही.

काय आहे व्हिडिओमध्ये?

फॅक्ट क्रेसेंडोच्या चॅटबॉट हेल्पलाईनवर (9049053770) वाचकांनी सदरील व्हायरल व्हिडिओ पाठवून सत्य पडताळणी करण्याची विनंती केली. दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काही लोक जमाव करून रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांवर हल्ला करताना दिसतात. दगड आणि काठ्यांनी वाहनांच्या काचा फोडतात. हा व्हिडिओ स्वीडमधील दंगलीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी व्हिडिओतील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडिओ स्वीडन दंगलाचा तर नाहीच, पण हा व्हिडिओ स्वीडनमधीलसुद्धा नाही.

टिओ-20 नावाच्या एक वृत्तस्थळावर 20 मे 2018 रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ आढळला. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ एकच आहेत. सोबतच्या बातमीनुसार, हा व्हिडिओ स्वित्झर्लंडमधील बाझिल (Basel) शहरातील आहे. तेथे 19 मे रोजी एका फुटबॉलमॅचनंतर प्रतिस्पर्धी संघांच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली होती. बाझील आणि लुझेर्न शहराच्या फुटबॉल संघातील सामना झाल्यानंतर स्टेडियम बाहेर हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. हा त्याचाच व्हिडिओ आहे.

मूळ बातमी येथे वाचा – टिओ 20

अधिक शोध घेतला असता या बाझेल शहर पोलिसांनी या घटनेसंदर्भात माहिती देणारी प्रेस रिलीज आढळली. यात सांगितले की, 19 मे 2018 रोजी फुटबॉल मॅचनंतर प्रेक्षकांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन लोक जखमी झाले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे मालमत्तेचेसुद्धा नुकसान झाले होते.

मूळ प्रेस रिलीज येथे वाचा – प्रेस रिलीज

यावरून स्पष्ट होते की, वाहनांवर हल्ला करण्याचा हा व्हिडिओ स्वीडन दंगलीचा नाही. हा व्हिडिओ 2018 साली स्वित्झर्लंडमध्ये एका फुटबॉलमॅचनंतर प्रेक्षकांनी घातलेल्या धुमाकूळाचा आहे. प्रतिस्पर्धी संघांच्या चाहत्यांमध्ये अशी हाणामारी झाली होती. दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह पसरविण्यात येत आहे.

(आपल्याकडील संशयास्पद मेसेजची सत्यता जाणून घ्यायची आहे? तर मग तो पाठवा फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांकावर 9049053770)

Avatar

Title:स्वित्झर्लंडमधील फुटबॉल प्रेक्षकांच्या भांडणाचा व्हिडिओ स्वीडनमधील दंगलीचा म्हणून व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False