2017 मधील मोर्चाचा फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा म्हणून व्हायरल

False राजकीय | Political

केंद्राच्या पावसाळी आधिवेशनात तीन कृषी विषयक विधेयक मंजूर करण्यात आल्यापासून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये याविरोधात शेतकरी आंदोलने करीत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विराट गर्दीचा एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, हा फोटो कृषी विधेयकाविरोधातील आंदोलनाचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दवा असत्य ठरला. हा फोटो तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली राजस्थानमध्ये अखिल भारतीय किसान सभेने केलेल्या आंदोलनाचा आहे. 

काय आहे दावा

कृषी विधेयक मागे घ्या या मागणीसाठी सुरू असलेला आंदोलनाचा फोटो म्हणून खालील छायाचित्र शेयर केले जात आहे. 

https://twitter.com/Sundarlalbohra/status/1308613767173828608

आर्काइव 

तथ्य पडताळणी

व्हायरल फोटो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा फेसबुकवर 2017 सालापासून हा फोटो उपलब्ध असल्याचे दिसले. 5 सप्टेंबर 2017 रोजी शेयर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, राजस्थानमधील सीकर येथे तत्कालिन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधातील आंदोलनाचा हा फोटो आहे. 

हा धागा पकडून अधिक शोध घेतला असता सीपीआयएम पक्षाच्या सीकर शाखेच्या फेसबुक पेजवर 4 सप्टेंबर 2017 रोजी हा फोटो शेयर केल्याचे आढळले.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

अखिल भारतीय किसान सभेतर्फे 2017 साली देशभरामध्ये ‘शेतकरी आंदोलन’ पुकारले होते. त्याअंतर्गत कर्जमाफी, पेन्शन योजना आणि मनरेगासाठी राजस्थानमध्ये विविध शहरांमध्ये निषेध सभा, रॅली, मोर्चे काढण्यात आले. 

4 सप्टेंबर 2017 रोजी सीकर शहरात तत्कालिन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा निषेध करण्यासाठी त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. हा त्या अंत्ययात्रेचा फोटो आहे. 

मूळ बातमी येथे वाचा – न्यूजक्लिक  

अखिल भारतीय किसान सभेच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभर आंदोलने करण्यात आली होती. याचा अर्थ की, 2017 साली झालेल्या शेतकरी आंदोलनाचे फोटो सध्या कृषी विधेयकाविरोधात सुरू असललेल्या आंदोलनाचे म्हणून शेयर करण्यात येत आहेत. ‘राजस्थान पत्रिका’ने सीकरमधील अंत्ययात्रा आंदोलनाचा व्हिडियो युट्युबवर शेयर केलेला आहे. 

निष्कर्ष

कृषी विषयक विधेयकाविरोधातील आंदोलनाचा फोटो म्हणून व्हायरल होत असलेला फोटो 2017 साली राजस्थानमध्ये झालेल्या शेतकरी मोर्चाचा आहे. 

Avatar

Title:2017 मधील मोर्चाचा फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा म्हणून व्हायरल

Fact Check By: Milina Patil 

Result: False