
मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आणि मित्र पक्ष शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर लढत देणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर लोकसत्ताचे एक ग्राफिक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, सदा सरवणकरांनी माघार घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची कबूली देत उद्धव ठाकरे गट सोडल्याचा पश्चाताप व्यक्त केला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती लोकसत्ता आणि सदा सरवणकर यांनी व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट असल्याचे स्पष्ट केले.
काय आहे दावा ?
सदा सरवणकर यांचा फोटो आणि लोकसत्ता वेबसाईटचा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “आज जेव्हा माझ्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव येतो तेव्हा मला उद्धव ठाकरे आठवतात. त्यांची साथ सोडली त्याचा परिणाम मी आज भोगतोय, सत्ता असेल नसेल पण उद्धव ठाकरे सारखा माणूस राजकारणात सापडणार नाही.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम सदा सरवणकर यांनी असे विधान केले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यमांवर सरवणकरांनी असे विधान केल्याचे आढळत नाही.
तसेच लोकसत्ताच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील हे ग्राफिक आढळले नाही.
या उलट लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर खालील प्रमाणे ग्राफिक कार्ड आढळले. या पोस्टमधील फोटो आणि लोगो एक सारखे आहे, परंतु, विधान वेगळे आहे.
तसेच फॅक्ट क्रेसेंडोने लोकसत्ता संकेतस्थळाचे संपादक योगेश मेहेंदळे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी व्हायरल ग्राफिक बनावट असल्याचे सांगितले. तसेच लोकसत्ताने अशी कोणतीही बातमी दिली नाही, अशी माहिती दिली.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सदा सरवणकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीनही नेत्यांनी मला आशीर्वाद दिला आहे. मी अर्ज भरल्यानंतर प्रचारही सुरू केला आहे. मी ज्या मतदारांसाठी मागच्या 15 वर्षांपासून काम करतोय त्यांच्यावर माझा विश्वास आहे. माझ्यावर ते प्रेम करतात. ते मला विजय मिळवून देतील.”
हे वक्तव्य येथे एकू शकता. तसेच संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.
सदा सरवणकर यांचे स्पष्टीकरण
व्हायरल व्हिडिओची दखल घेत सदा सरवणकर यांनी फेसबुक पेजवर स्पष्ट केले की, “अशाप्रकारे कुठलीही प्रतिक्रिया मी दिलेली नाही. आणि लोकसत्ताने ही अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही. या खोडसाळपणाची तक्रार ‘सायबर क्राइम’ शाखेकडे करण्यात येणार आहे.”
तसेच सरवणकरांनी पोस्टमध्ये शेअर केलेला तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मुळ ग्राफिक कार्डला एडिट करुन बनावट विधान पसरवले जात आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट असून लोकसत्ताने जारी केलेले नाही. तसेच सदा सरवणकर यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. खोट्या दाव्यासह ग्राफिक व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:लोकसत्ताचे लोगो वापरुन सदा सरवणकरांच्या नावने बनावट ग्राफिक व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Altered
