
भारतामध्ये अनेक खाजगी कंपन्या गरीब व होतकरू विद्यार्थांना त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृती देण्याचे काम करत असतात.
याच पार्श्वभूमीवर मलाबार गोल्ड अँड डायंमड कंपनीच्या चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बुरखा घातलेल्या काही मुली दिसतात.
दावा केला जात आहे की, मलबार चॅरिटेबल ट्रस्ट फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा भ्रामक आहे. मलबार चॅरिटेबल ट्रस्ट विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवरून त्यांची निवड करते.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये मलबार चॅरिटेबल ट्रस्टचे फलक दिसते आणि बुरखा घातलेल्या काही मुली प्रमाणपत्र सहीत दिसतात.
युजर्स हा फोटोशेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मलबार गोल्ड कंपनीचे 99.9% दागिने हिंदू खरेदी करतात. पण या फोटोनुसार ही कंपनी 100% शिष्यवृत्ती फक्त मुस्लिम मुलांना देते.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ मलबार चॅरिटेबल ट्रस्टने गेल्यावर्षी आयोजित केलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा आहे.
मलाबार गोल्ड अँड डायंमड कंपनीने 21 जानेवारी 2023 रोजी आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मिहिती दिली होती की, “कर्नाटक प्रदेशात हा शैक्षणिक शिष्यवृत्ती कार्यक्रमात अयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संकुचित विचार न करता समाजातील सर्व घटकांमधील 4 हजार पेक्षाजास्त विद्यार्थींची निवड करण्यात आली आहे.”
व्हिडिओमध्ये सुरूवातीला 00:13 सेकंदावर स्पष्ट करण्यात आले होते की, “या कर्यक्रमात जात किंवा समुदायाचा विचार न करता समाजाच्या सर्व घटकांमधील गरजू कुटुंबातील तेजस्वी तरुणींचा समावेश करण्यात आला.”
पुढे व्हिडिओमध्ये 1:03 मिनिटावर आपण व्हायरल फोटो व बाजूला त्याच प्रमाणे बुरखा न घातलेल्या विद्यार्थींनी पाहू शकतो.
व्हिडिओमध्ये नमूद केले आहे की, मंगळुरूमधील 630 विद्यार्थ्यांची या शिष्यवृतीसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच ठिकाणी बंगळुरू, मंगलोर, म्हैसूर, हसन, तुमकूर, हुबळी, धारवाड, दावणगेरे, शिमोगा, कलबुर्गी, बेलगावी, बेल्लारी, विजयपुरा, मंड्या, उडुपी आणि चिकमंगलुरू या शहरातील विद्यार्थींनी शिष्यवृत्ती देण्यात आली होतो.
मूळ व्हिडिओ – युट्यूब
या कार्यक्रमात शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या विद्यार्थींनीचे ग्रुप फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मलबार चॅरिटेबल ट्रस्ट आयोजीत या कार्यक्रमात जात व धर्मावरून भेदभाव न करता मुस्लिम विद्यार्थिनींसोबत इतर ही होतकरू विद्यार्थींनींना शिष्यवृत्ती देण्यात आली होती.

मलबार चॅरिटेबल ट्रस्टच्या वेबसाइटवरील ‘अबाउट’ विभागात नमूद केले आहे की, “जात-पात व धर्माच्या आधारे भेदभावा न करता अनाथ व निराधारांचे पालनपोषण करणे आणि त्यांना शिक्षण देणे, हे ट्रस्टचे उद्दष्ट आहे.”
मूळ पोस्ट – मलबार चॅरिटेबल ट्रस्ट | आर्काइव्ह
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा भ्रामक आहे. मलबार चॅरिटेबल ट्रस्ट जात व धर्मावरून शिष्यवृत्ती देत नाही, तर विद्यार्थ्यांनींची गुणवत्ता आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवरून त्यांची निवड केली जाते. खोट्या दाव्यासह हा फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:मलबार चॅरिटेबल ट्रस्ट फक्त मुस्लिम मुलींनाच शिष्यवृत्ती देते का ? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: False
