
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी दिल्लीत काँग्रस प्रमुखांची भेट घेतली होती. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसोबत दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरे राहुल गांधींसमोर नतमस्तक झाले.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट असून भ्रामक दाव्यासह शेअर केला जात आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये उद्धव ठाकरे, राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पाठिमागे चंद्र व तारा असलेला हिरवा झेंडा दिसतो.
फोटोसोबत ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “हिंदुत्वाचा सोडला बाणा, हिंदुद्रोह्यांपुढे झुकला उबाठाचा कणा !”
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मुंबईची मांजर इटलीता नातू समोर झुकली.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहे.
शिवसेनेच्या अधिकृत ट्विटरवर 7 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधीची घेतलेल्या भेटीचे फोटो शेअर करण्यात आलेले आहेत. पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीत भेट भेटली. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते.”
आपण खाली उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या भेटीचा फोटो पाहु शकतो.
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शिवसेनेच्या अधिकृत ट्विटरवरून स्पष्ट करण्यात आले की, “हा फोटो बनावट आहे. छेडछाड केलेले फोटो ट्विट केल्याबद्दल आम्ही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.”
तसेच उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीचे फोटो लोकसत्ता वृत्ताने आपल्या वेबसाईवर शेअर केला आहेत. ते आपण येथे पाहू शकता.
मग हा फोटो कुठला आहे ?
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी 8 ऑगस्ट रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता आणि त्यांच्या पालकांची भेट घेतली होती.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ फोटोला एडिट करत अरविंद केजरीवाल यांच्या पालकांच्या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या नमस्कारांचा फोटो एकत्र करून भ्रामक दाव्यासह व्हायरल होत आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो बनावट आहे. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना झुकून नमस्कार केला नाही. दोन वेगवेगळे फोटो एकत्र करून खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:बनावट फोटो व्हायरल: उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना झुकून नमस्कार केला का?
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
