झी न्यूजची फेक न्यूजः राहुल गांधी यांनी उदयपूर हत्याकांडातील आरोपींना माफ करण्याची मागणी केली नाही

False राजकीय | Political

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उदयपूर हत्याकांडातील आरोपींना “लहान मुलं” म्हणून माफ करण्याची मागणी केली, अशी खोटी बातमी व्हायरल होत आहे. राहुल गांधी पत्रकारांशी बोलतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कन्हैयालाल यांची हत्या करणाऱ्यांना त्यांनी “छोटे बच्चे” म्हटले आणि त्यांना माफ करा असे म्हटले.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून उदयपूरमधील शिवणकाम व्यावसायिक कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली होती. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणी कळाले की, राहुल गांधी यांनी अशी कोणतीही मागणी केलेली नाही. वायनाड येथील त्यांच्या कार्यलयाची तोडफोड करणाऱ्या एसएफआयच्या कार्यकर्त्यांबद्दल ते बोलत होते. 

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी पत्रकारांशी बोलत आहेत. ते म्हणातात की, देशामध्ये भीती आणि द्वेष पसरविला जात आहे आणि असे करणेच राष्ट्रविरोधी गोष्ट आहे. ज्या मुलांनी हे केले ते लहान आहेत. त्यांनी जे केलं ते योग्य नाही, ते बेजबाबदारपणे वागले. त्यांच्याविषयी माझ्या मनात राग किंवा द्वेष नाही. त्यांनी मुर्खपणा केला परंतु, आपण या गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नये. त्यांना माहिती नाही की त्यांनी जे केले त्याचे काय परिणाम होतील. आपण त्यांना माफ केले पाहिजे.

मूळ पोस्ट – फेसबुकफेसुबक

हा व्हिडिओ शेअर करून लोक म्हणत आहेत की, “राहुल गांधी किती नीच आहे ते पहा. कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपी हे लहान आहेत, त्यामुळे त्यांना माफ करावे अशी अपेक्षा व्यक्त करतोय. खरं तर हा मुसलमान आहे आणि म्हणूनच हा नेहमी मुस्लिम गुन्हेगारांच्या बाजूने उभा असतो. हा देशद्रोही सुद्धा आहे, म्हणूनच नेहमी देशविघातक कृत्य्यांच्या समर्थनार्थ उभा असतो.”

झी न्यूज वाहिनीच्या डीएनए कार्यक्रमात अँकर रोहित रंजन यांनी राहुल गांधींनी उदयपूर हत्याकांडातील आरोपींना लहान म्हणत माफ करण्याची मागणी केली असे म्हटले होती. त्यांच्या कार्यक्रमातील ही क्लिप व्हायरल होत आहे. 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा राहुल गांधी यांच्या पत्रकारपरिषदेचा मूळ व्हिडिओ शोधला. तेव्हा कळाले की, 1 जुलै रोजी राहुल गांधी केरळमधील वायनाड येथे गेले होते. राहुल गांधी वायनाडचे खासदार आहेत.  

राहुल गांधी यांनी वायनाडमधील कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. केरळचे विरोधीपक्ष नेते आणि कांग्रेस आमदार व्ही. डी. सतीशन यांच्या फेसबुक अकाउंटवरून या पत्रकार परिषदेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.

संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळाले की, राहुल गांधी उदयपूर हत्या प्रकरणातील आरोपींना माफ करण्याविषयी नव्हते बोलले.

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (SFI) कार्यकर्त्यांनी 24 जून रोजी राहुल गांधींच्या वायनाडमधील कार्यालयाची तोडफोड केली होती. याविषयी पत्रकारांनी राहुल गांधींना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की, हे माझे कार्यालय असले तरी ते वायनाडच्या जनतेचेसुद्धा कार्यालय आहे. त्यामुळे याची तोडफोड होणे दुर्दैवी गोष्ट आहे. सध्या देशात प्रत्येक गोष्टीचे समाधान हिंसेतून शोधले जात आहे. तोडफोड करणारे लहान आहेत. त्यांना नाही माहित की त्यांनी काय केले…त्यांच्याविषयी माझ्या मनात राग किंवा द्वेष नाही. 

यानंतर पत्रकारांनी नूपुर शर्माविषयी सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिपण्णीविषयी प्रश्न विचारला. सर्वोच्च न्यायालयाने देशातील बिघडलेल्या वातावरणास नूपुर शर्मा जबाबदार असल्याचे म्हटले होते. राहुल गांधी यावर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने जे म्हटले ते योग्यच आहे. परंतु, देशातील वातावरण खराब होण्यास कोणी एक व्यक्ती जबाबदार नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा जबाबदार आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने एशियानेट वाहिनीच्या स्थानिक प्रतिनिधीशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, पत्रकारांनी राहुल गांधी यांना उदयपूर हत्या प्रकरणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला नव्हता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ते वायनाड कार्यालयाच्या तोडफोड करणाऱ्या SFI च्या कार्यकर्त्यांविषयी बोलत होते. 

झी न्यूज वाहिनीने मागितली माफी

व्हायरल व्हिडिओची सत्यता समोर आल्यानंतर झी न्यूजचे अँकर रोहित रंजन यांनी माफी मागितली. “काल आमच्या डीएनए कार्यक्रमात राहुल गांधींचे वक्तव्य उदयपुरच्या घटनेशी जोडण्यात आले. ती एक मानवी चूक होती. आमची टीम यासाठी माफी मागत आहे.”

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, राहुल गांधी यांनी उदयपूर हत्या प्रकरणातील आरोपींना माफ करण्याची मागणी केलेली नाही. वायनाड कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या SFI च्या कार्यकर्त्यांना माफ करण्याविषयी ते बोलत होते. त्यांच्या या व्हिडिओला चुकीच्या माहितीसह पसरविले जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:झी न्यूजची फेक न्यूजः राहुल गांधी यांनी उदयपूर हत्याकांडातील आरोपींना माफ करण्याची मागणी केली नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False