
दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या भीषण आगीमुळे वन्यप्राणी आणि निसर्गाचे आतोनात नुकसान झाले. सुमारे महिनाभर हे जंगल वणव्याने पेटलेले होते. जंगल जळून खाक होत असतानाचे फोटो पर्यावरणप्रेमी आणि सेलिब्रेटिंनी शेयर केले. त्यापैकी एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
या व्हायरल फोटोत एक सैनिक बिबट्याला पाण्यातून कडेवर घेऊन जाताना दिसतो. बिबट्यानेसुद्धा अत्यंत प्रेमाने सैनिकाच्या खांद्यावर डोके टेकवलेले आहे. दावा केला जात आहे की, अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीतून या बिबट्याला वाचविण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचाकांनी व्हॉट्सअॅपवर (9049043487) या फोटोची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक
काय आहे पोस्टमध्ये?
फेसबुकवर बिबट्याचा व्हायरल फोटो शेयर करून कॅप्शन दिले आहे की, अॅमेझॉनच्या खोऱ्याला लागलेल्या आगीतून रेस्क्यू टीमने वाचवलेल्या एका बिबट्या व रेस्क्यू कमांडोचा हा फोटो आहे. सध्या जगभर गाजतोय एकमेकांच्या खांद्याला खांदा टेकऊन उभे रहावे लागेल.
तथ्य पडताळणी
अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीचे म्हणून अनेक जुने आणि संदर्भही फोटो शेयर करण्यात आले होते. त्यामुळे हा फोटोदेखील असाच आहे का हे शोधण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून ड्युरांगो हेराल्ड वेबसाईटवर हा फोटो आढळला. तेथे हा फोटो मे 2016 मध्ये घेण्यात आल्याचे म्हटले आहे. ब्राझीलच्या सैन्याने सांभाळलेल्या Jiquitaia नावाच्या जग्वारला (बिबट्यासदृश्य प्राणी) निग्रो नदीमध्ये पोहायला घेऊन गेलेल्या सैनिकाचा हा फोटो आहे. म्हणजे हा फोटो 3 वर्षांपूर्वीचा आहे. तसेच सदरील सैनिक बिबट्याला वाचवत नसून, पोहायला गेला होता.

मूळ लेख येथे वाचा – The Durango Herald । अर्काइव्ह
असोसिएट प्रेसने (AP) दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो नोन मँग्वेरिया नावाच्या छायाचित्रकाराने काढला होता. सदरील छायाचित्रकाराने सांगितले की, ब्राझीलच्या मिलिटरी कमांड ऑफ द अॅमेझॉन (CMA) तुकडीला हे पिल्लू जंगलात सापडले होते. शिकाऱ्यांनी त्याच्या आईची शिकार केल्यानंतर सैनिकांनीच त्याचा सांभाळ केला. मिलिटरीने अॅमेझॉनच्या जंगलातील जग्वार संरक्षणासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतलेला आहे. हे सैनिक रोज जग्वारला नदीमध्ये पोहायला घेऊन जातात. अशाच एके दिवशी मी हा फोटो काढला होता.

मूळ लेख येथे वाचा – AP । अर्काइव्ह
छायाचित्रकार नोन मँग्वेरिया यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरूनदेखील 9 मार्च 2016 रोजी हा फोटो शेयर केला होता. खाली दिलेल्या पोस्टमध्ये तुम्ही यावेळीचे वेगवेगळे फोटो पाहू शकता.
मूळ फोटो येथे पाहा – फेसबुक
निष्कर्ष
सदरील व्हायरल फोटो 3 वर्षांपूर्वीचा असून त्याचा या वर्षी अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीशी काही संबंध नाही. नोन मँग्वेरिया यांनी मार्च 2016 मध्ये हा फोटो काढला होता. ब्राझीलच्या आर्मीतील सैनिक या जग्वारला पोहायला घेऊन गेला होता. तेव्हाचा हा फोटो आहे. त्यामुळे आगीतून वाचवतानाचा हा फोटो असल्याचा दावा खोटा आहे.

Title:बिबट्याला अॅमेझॉनच्या आगीतून वाचवतानाचा हा फोटो नाही. त्यामागचे सत्य वाचा
Fact Check By: Agastya DeokarResult: False
