मध्य प्रदेशमधील मॉब लिंचिंगचा व्हिडियो वाशिम जिल्ह्यातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

False Medical
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

वाशिम जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास गावकऱ्यांनी चोप दिल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. व्हिडियोमध्ये चिडलेले गावकरी दगड, काठ्यांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअपवर पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली. व्हिडियोची सत्यता तपासली असता हा व्हिडियो वाशिम जिल्ह्यातील नसल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

वाशिम जिल्हा सांगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला बेदम मारहाण करण्यात आली, अशा मेसेजसह सुमारे एका मिनिटाचा व्हिडियो पसरविला जात आहे. 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम वाशिम जिल्ह्यात अशी काही घटना घडली का याची माहिती घेतली तेव्हा इंटरनेटवर अशा प्रकारची एकही बातमी आढळून आली नाही. व्हिडियोमध्ये ज्यापद्धतीने लोक मारहाण करीत आहे त्यानुसार या घटनेची मोठी बातमी होणे अपेक्षित आहे. परंतु, तसे काही दिसले नाही.

मग हा व्हिडियो खरंच वाशिम जिल्हातील आहे की, इतर ठिकाणचा याचा शोध घेतला. त्यासाठी व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यानुसार कळाले की, हा व्हिडियो मध्य प्रदेशातील आहे.

न्यूज-18 वाहिनीवर हा व्हिडियो उपलब्ध आहे. 5 फेब्रुवारीच्या बातमीनुसार, मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील सहा जणांना गावकऱ्यांनी लहान मुले चोरणारी टोळी समजून मारण्याची घटना घडली होती. याचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

यासंबंधी आणखी माहिती घेतल्यावर दैनिक भास्करने दिलेली बातमी आढळली. त्यानुसार, मध्य प्रदेशमधील खडकिया गावात ही घटना घडली होती. पाच शेतकरी व त्यांच्यासोबत आलेल्या चालकाला ‘बच्चा चोर’ म्हणून गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये ड्राईव्हरचा मृत्यू झाला.

पीडित शेतकऱ्यांनी या गावातील काही मजदुरांना आगाऊ रक्कम देऊन कामासाठी ठेवले होते. परंतु, काही कामगार पैसे घेऊन काम न करता परत गावी निघून आले. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना पैसे परत करण्यास सांगितले. मग या मजदुरांनी त्यांना गावात बोलवले. ते येताच गावात ‘बच्चा चोर’ आले अशी अफवा त्यांनी पसरविली.त्यावर विश्वास ठेऊन शेकडोच्या संख्येने गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक गणेश (38) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींमध्ये जगदीश राधेश्याम शर्मा (45), नरेंद्र सुंदरलाल शर्मा (42), विनोद तुलसीराम मुकाती (43), रवि शंकरलाल पटेल (38), जगदीश पूनमचंद शर्मा यांचा समावेश असून त्यांना इंदूर येथे भरती करण्यात आले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – दैनिक भास्कर

वृत्तसंस्था ANI ने 11 फेब्रुवारी रोजी दिलेल्या बातमीत एसपी आदित्य प्रताप सिंह यांनी माहिती दिली की, या प्रकरणी 12 लोकांना अटक करण्यात आली असून 35 संशयितांची ओळख पटविण्यात आली होती. हा हल्ला घडवून आणण्यात अवतार सिहं आणि भुवन सिंह याचा प्रमुख हात असल्याचे पोलीस तपासात समोर आले. संशियतांवर खून व खूनाचा प्रयत्न या गुन्ह्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, मॉब लिंचिंगचा हा व्हिडियो वाशिम जिल्ह्यातील नाही. मध्य प्रदेशमधील एका गावात मजदुरांच्या पैशावरून ही मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे सोशल मीडियावर केला जाणारा दावा चुकीचा आहे.

Avatar

Title:मध्य प्रदेशमधील मॉब लिंचिंगचा व्हिडियो वाशिम जिल्ह्यातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply