बंगळुरूमध्ये पोलिसांना मारहाण करण्याचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

कोरोना विषाणुमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु, लोकांना घरातच राहा म्हणून सांगताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे नागरिक व पोलिसांमध्ये वाद होत असल्याच्याही घटना घडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर काही तरुण पोलिसांना मारहाण करीत असल्याचा व्हिडियो प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडियो मुंबईतील आग्रीपाडा येथील असल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो कर्नाटकमधील बंगुळूरु शहरातील असल्याचे समोर आले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

व्हिडियोमध्ये दोन जण पोलिसांवर अरेरावी करीत चाल करीत जाताना दिसतात. काही लोक त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात परंतु, ते रागाच्या भरात पोलिसांना मारहाण करीत रस्त्यावर पाडतात. एक महिलादेखील पोलिसांवर ओरडत असल्याचे दिसते. हा व्हिडियो शेयर करून म्हटले जात आहे की, मुंबई पोलिसांवर हात वर करणारे निर्लज माणसं.  आग्रीपाडा मुंबई – ११. ह्यांवर कारवाई झालीचं पाहीजे.

police beaten.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसुबकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम इन-व्हिड टुलच्या माध्यमातून या व्हिडियोच्या की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून ट्विटरवर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात आल्याचे दिसले. अनेक लोकांनी हा व्हिडियो बंगळुरू शहरातील संजय नगर भागातील असल्याचे म्हटले आहे. 

हा धागा पकडून जेव्हा शोध घेतला तेव्हा द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने हा व्हिडियो ट्विट केल्याचे आढळले. यामध्ये म्हटले की, बंगळुरू शहरातील संजय नगर भागात लॉकडाऊनदरम्यान आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या दोन पोलिसांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

अर्काइव्ह

बिझनेस स्टँडर्डच्या बातमीनुसार, 25 मार्च रोजी ही घटना घडली होती. लॉकडाऊनदरम्यान बाहेर पडल्याबद्दल दोन तरुणांना पोलिसांनी हटकल्यानंतर त्यांनी पोलिसांना अरेरावी करीत मारहाण केली होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, 9 जणांवर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बंगळुरूचे पोलिस आयुक्त भास्कर राव यांनी माहिती दिली होती.

संशयितावर चालवली गोळी

बँगलोर मिरर आणि दाईजी वर्ल्ड वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, पोलिसांना मारहाण करणाऱ्या संशयितांना 26 मार्चच्या पहाटे अटक करण्यासाठी पोलिस गेले होते. तेव्हा एका संशयित आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी चालवली. यामध्ये तो जखमी झाली. आरोपीने पळून जाताना पोलिसांवर दगडफेक केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

mirror.png

मूळ बातमी येथे वाचा – बँगलोर मिररअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा हा व्हिडियो मुंबईतील आग्रीपाडा येथील नाही. हा व्हिडियो बंगळुरू शहरातील संजय नगर भागातील आहे. तेथे 25 मार्च रोजी लॉकडाऊनदरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या दोन पोलिसांनी एका गटाने मारहाण केली होती. त्याचाच हा व्हिडियो आहे.

Avatar

Title:बंगळुरूमध्ये पोलिसांना मारहाण करण्याचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False