इंडोनेशियातील दरड कोसळण्याचा व्हिडियो गोवा-मडगाव हायवेवरील घटना म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडतच असतात. अशाच एका घटनेचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्यावर दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दुचाकी दबून गेल्याचे दिसते. हा व्हिडियो गोवा-मडगाव महामार्गावर घडलेल्या घटनेचा म्हणून पसरविला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो इंडोनेशियामधील असल्याचे आढळले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडियोचे निरीक्षण केल्यावर लक्षात येते की, रस्त्यावर वाहने उजव्या बाजूने धावत आहेत. भारतात वाहने डाव्या बाजूने चालतात. तसेच व्हिडियोतील भाषादेखील गोवा-मडगाव महामार्ग ज्या भागातून जातो तेथील नाही. त्यामुळे व्हिडियोच्या स्थानाबाबत शंका उपस्थित होते.

व्हिडियोतील की-फ्रेम्सची निवड करून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर समोर आले की, हा व्हिडियो गेल्या एप्रिल महिन्यापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. अधिक शोध घेतल्यावर मेट्रो टीव्ही न्यूज चॅनेलची बातमी आढळली. त्यानुसार, इंडोनेशियातील Cianjur येथे 9 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. सुमारे शंभर मीटर उंचावरून मातीचा ढीग रस्त्यावर आला होता. 

या घटनेचा वेगळ्या अँगलने काढलेला व्हिडियोदेखील आम्हाला मिळाला. हे व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर बरीच टीकादेखील झाली होती. आसपासच्या लोकांनी व्हिडियो काढण्याऐवजी ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांची मदत करायला हवी होती, असा तक्रारीचा सूर त्यात होता.

मे महिन्यात हाच व्हिडियो मेघालयातील म्हणूनदेखील व्हायरल झाला होता. तेव्हा मेघालय पोलिसांनी याबाबत खुलास केला होता. तो व्हिडियो मेघालय महामार्गवरील नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, गोवा-मडगाव महामार्गावर दरड कोसळल्याचा म्हणून जो व्हिडियो व्हायरल होत आहे तो मूळात इंडोनेशियातील आहे. तेथे एप्रिल महिन्यात ही घटना घडली होती. चुकीच्या माहितीसह हा व्हिडियो पसरविला जात आहे. नागरिकांनी अशा खोट्या पोस्टवर विश्वास ठेवू नये.

Avatar

Title:इंडोनेशियातील दरड कोसळण्याचा व्हिडियो गोवा-मडगाव हायवेवरील घटना म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply