
2020 हे संकटाचे वर्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कोरोनाच्या हाहाकारासोबतच नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागत आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तर, छत्तीसगडमध्ये विषारी वायू गळती झाली.
आता सोशल मीडियावर रोड खचून वाहनांचे नुकसान झाल्याचा एक व्हिडियो पसरत आहे. या व्हिडियोसोबत दावा केला जात आहे की, बंगळुरूमध्ये भूकंपामुळे जमीन दुभंगली.
फॅक्ट क्रेसेंडोने या संदर्भात पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे आढळले.
काय आहे पोस्टमध्ये?
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअप हेल्पलाईनवर (9049043487) पुढील रिक्वेस्ट पाठवली. अडीच मिनिटांच्या व्हिडियोमध्ये खचलेली जमीन, त्यामध्ये घसरलेले वाहने दिसतात. सोबतच्या मेसेजमध्ये म्हटले की, आज सकाळी 6 वाजता बंगळुरू येथे मोठा आवाज होऊन जमीन दुभंगली. 2020 अजून काय काय दाखवील काय माहित.

हाच व्हिडियो युट्यूबवरदेखील उपलब्ध आहे. त्यात म्हटले की, बंगळुरूमध्ये भूकंप आल्याने मोठा आवाज होऊन जमीन दुभंगली.
मग खरं काय आहे? बंगुळूरमध्ये खरंच भूकंपामुळे जमीन दुभंगली का?
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम बंगळुरूमध्ये भूकंप आला का याची तपासणी केली असता अशी कोणतेही माहिती समोर आली नाही. बंगळुरूमध्ये अशात तरी भूकंप झालेला नाही. मग जमीन कशी दुभंगली?
कीवर्ड्सने सर्च केले असता बँगलोर मिरर वेबसाईटवरील बातमी आढळली. यानुसार, 24 एप्रिल रोजी बंगळुरूमध्ये जोरदार पावसाने झोडपले होते. भर उन्हाळ्यात वादळ-वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने शहराला तडाखा दिला. सदरील बातमीत व्हायरल होत असलेला व्हिडियोदेखील दिलेला आहे.
त्यानुसार हा व्हिडियो बंगळुरूच्या लॅगेर भागातील लक्ष्मीदेवी नगर येथील आहे. जोरदार पावसामुळे वॉर्ड क्रमांक 69 येथील रस्ता खचला तसेच भिंतदेखील कोसळली. यामध्ये 12 वाहनांचे नुकसान झाले.

मूळ बातमी येथे वाचा – बंगलोर मिरर । अर्काइव्ह । द हिंदू
‘टीव्ही-9 कन्नड’ या वृत्तवाहिनीनेदेखील हा व्हिडियो प्रसिद्ध करीत बातमी दिली होती की, जोरदार पावसामुळे बंगळुरूच्या लॅगेर भागात रस्ता खचला. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, 23 एप्रिलच्या रात्री सुरू झालेल्या पावसाने गेल्या 20 वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले. तडाखा बसलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, बंगळुरूमध्ये भूकंपामुळे जमीन दुभंगलेली नाही. 24 एप्रिल रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता खचला होता. सदरील घटना बंगळुरूच्या लॅगेर भागात घडली होती. त्याचा व्हिडियो सोशल मीडियावर शेयर करून भूकंपाची अफवा पसरवून भीती घातली जात आहे.

Title:बंगळुरूमध्ये भूकंपामुळे जमीन दुभंगल्याचा हा व्हिडियो नाही. वाचा त्या व्हिडियोचे सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
