
सध्या पावसाळ्याचे दिसून असून अनेक ठिकाण दरड कोसळण्याच्या रस्ते आणि रेल्वेमार्ग खचण्याचा घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी याबाबतचे जुने व्हिडिओ आणि खोटी माहिती पसरविण्यात येत असल्याचेही उघड झाले आहे. मुंबईत पाऊस सुरु असतानाच असे काही व्हिडिओ समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहेत. असाच एक व्हिडिओ कोपर दिवा दरम्यानचा नाला म्हणून Vilas Salunkhe यांनी पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठेला आहे आणि कधीचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
कोपर दिवा दरम्यान नाला म्हणून व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यावर आम्ही कोपर दिवा दरम्यान अशी काही घटना घडली आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अशा स्वरुपाचे कोणतेही वृत्त आम्हाला दिसून आले नाही. त्यानंतर आम्ही रेल्वे रुळाखालील माती खचण्याच्या घटना कुठे घडल्या याचा शोध घेतला. त्यावेळी दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या संकेतस्थळावरील 4 सप्टेंबर 2019 रोजीचे एक वृत्त आम्हाला दिसून आले.
दैनिक सकाळनेही या घटनेचे वृत्त देत ही घटना बेलापूर रेल्वे स्टेशन लगत असलेल्या नाल्याजवळ माती घसरत असून तात्काळ डागडुजी करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. सकाळच्या फेसबुक पेजवरही हा व्हिडिओ प्रसिध्द करण्यात आला असून तो आपण खाली पाहू शकता.
दरम्यान याबाबतचे वृत्त पाहिल्यानंतरही हा नेमका त्याच ठिकाणचा आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आम्हाला त्यांनी 4 सप्टेंबर 2019 रोजी ही घटना हार्बर रेल्वे मार्गावर बेलापूर स्थानकाजवळ घडली होती, असे स्पष्ट केले. या ठिकाणची तातडीने दुरुस्ती करण्यात आली असून हा मार्गावरील रेल्वेसेवा सुरळित आणि सुरक्षित करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. दिवा-कोपर मार्गावरील हा व्हिडिओ नसल्याचेही त्यांनी सांगितले. समाजमाध्यमांवर चुकीची माहिती पसरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
निष्कर्ष
बेलापूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाखालील माती निघाल्याची घटना 4 सप्टेंबर 2019 रोजी घडली होती. या ठिकाणी रेल्वेने तातडीने दुरुस्ती केली आहे. तेथील व्हिडिओ दिवा-कोपर मार्गावरील आणि अन्य ठिकाणचा असल्याचे सांगून चुकीच्या माहितीसह पसरविण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact : बेलापूर रेल्वे स्थानकाजवळचा व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणांच्या नावाने व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
