ट्रॅक्टरद्वारे पोलीस बॅरिगेड्स तोडून जातानाचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही; वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

पंजाब, हरियाणासह उत्तरेतील अनेक शेतकरी संघटना विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच करीत आहेत. त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून रस्त्यावर टोकदार खिळे आणि बॅरिगेड्स लावले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक ट्रॅक्टरद्वारे पोलीस बॅरिगेड्स तोडून पुढे जाताना दिसतात.

दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओ सध्याच्या ‘किसान आंदोलन’ अर्थात ‘शेतकरी आंदोलनाचा’ आहे.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही. हा व्हिडिओ भाना सिद्धूच्या सुटकेच्या मागणीसाठी पंजाबमधील केलेल्या निषेध मोर्चाचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये काही ट्रॅक्टर चालकांना पोलिसांन समोर बॅरिगेड्स तोडून पुढे जाताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन धडकणार पंजाब हरियाणा मधून हजारो ट्रॅक्टर ट्रॉली दिल्ली कडे निघालेत.”

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर व्हायरल क्लिपचा मोठा व्हिडिओ भाना सिद्धू नामक व्यक्तीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आढळला. हा व्हिडिओ शेअर करताना पंजाबी भाषेत लिहिले होते की, “बडबर टोल प्लाझा येथे जीपसह पोलिस संरक्षण तोडून तरुणांनी मोर्चात भाग घेतला.”

https://www.instagram.com/reel/C24LQLOvWkh/?utm_source=ig_web_copy_link

हा धागा पकडू अधिक सर्च केल्यावर कळाले की, भाना सिद्धू हा पंजाबमधील एक सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर असून लुधियाना पोलिसांनी गेल्या 21 जानेवारीला चोरी व इतर आरोपाखाली त्याला अटक केले होते.

भाना सिद्धूच्या सुटकेच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी संगरूरकडे मोर्चा काढला होता. या मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी बडबर टोल प्लाझा येथे बॅरिकेड्स लावले होते. आंदोलकांनी ट्रॅक्टरसह ते बॅरिकेड्स तोडले होते. 

तसेच या घटनेनंतर भाना सिद्धूच्या वडिल, भावंड आणि आंदोलकांवर सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि ड्युटीवर असलेल्या पोलिसांना मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या भाना सिद्धूला जामीन मंजूर झाला आहे. अधिक महिती आपण येथे वाचू शकतात.

पीटीसी न्यूजने या आंदोलनदरम्यान झालेल्य संघर्षाचे थेट प्रक्षेपण केले होते. खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ आणि भाना सिद्धूच्या अटके विरुद्ध काढलेला मोर्चाचा व्हिडिओ एकच आहे.

सध्या शेतकरी आंदोलन

पिकांच्या किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील हजारोच्या संख्येने आंदोलक शेतकरी सिंघू, टिकरी, गाझीपूर, नोएडा आदी दिल्लीच्या सीमांवर येऊन धडकल्यामुळे या सीमांची नाकाबंदी करण्यात आली आहे. या सीमांवरून दिल्लीत येणाऱ्या मार्गांवर काँक्रीट ब्लॉक, स्पाइक अडथळे आणि काटेरी तारा लावून अवजड वाहनांच्या प्रवेशांना बंदी घालण्यात आली आहे. शीर्घ कृती दलांसह हजारो पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. या भागांमध्ये तसेच राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) अनुच्छेद 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीसह ‘एनसीआर’मध्ये मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ट्रॅक्टर आदी अवजड वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे.

शेतकरी आंदोलकांवर ड्रोनच्या साह्याने अश्रुधुराचा मारा केला गेला.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय ?

1) किमान आधारभूत किंमतीसाठी (हमीभाव) कायदा करावा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.

2) शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे.

3) दोन वर्षांपूर्वी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत.

4) लखीमपूर खिरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्यावा.

5) 58 वर्षांवरील शेतकरी व शेतमजुरांना दरमहा 10 हजारांचे निवृत्त वेतन लागू करावे.

6) भारताने जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडावे. 

अधिक माहिती येथे वाचू शकतात.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही. हा व्हिडिओ भाना सिद्धूच्या सुटकेच्या मागणीसाठी पंजाबमधील केलेल्या निषेध मोर्चाचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:ट्रॅक्टरद्वारे पोलीस बॅरिगेड्स तोडून जातानाचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading