केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणारी तरुणी हैदराबाद पीडिता नाही. त्या स्वयंउद्योजिका श्रीमती अल्लोला दिव्या रेड्डी आहेत.

False सामाजिक

हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेच्या नावे एक व्हिडियो सध्या फिरत आहे. यामध्ये एक तरुणी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत आहे. त्यानंतर ती गोपालनाविषयी भाषणदेखील करते. ही तरुणी म्हणजे हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडिता असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केल्यावर हा दावा खोटा असल्याचे आढळले.

काय आहे पोस्टमध्ये?

व्हिडियोमध्ये एक तरुणी केंद्रीय मंत्री कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते एक पुरस्कार स्वीकारते. त्यानंतर केलेल्या भाषणात तिने गोपालन, देशी गाय आणि तिच्या दुधाचे महत्त्व तसेच शेतकऱ्यांनी गोपशुधनाचा कसा सांभाळ करावा याविषयी विचार मांडले आहेत. व्हिडियोसोबत युजर्स कॅप्शन देत आहेत की, हैद्राबादची पीडित मुलगी बघा किती प्रतिभाशाली डॉक्टर होती.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर कळते की, सदरील तरुणीचे नाव श्रीमती अल्लोला दिव्या रेड्डी आहे. हा धागा पकडून जेव्हा शोध घेतला तेव्हा कळाले की, हा व्हिडियो 1 जून 2018 रोजी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार सोहळ्यातील आहे. सदरील व्हायरल होत असलेला मूळ व्हिडियोदेखील सापडला. त्यानुसार, श्रीमती अल्लोला दिव्या रेड्डी यांना देशी गिर गाईंचे पालन व दुधाच्या गुणवत्तेबाबत दिलेल्या योगदानासाठी गेल्यावर्षी तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. गोपालन व संशोधन कार्य करणाऱ्या व्यक्तींना 2014 पासून दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.  व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

कोण आहेत अल्लोला दिव्या रेड्डी

तेलंगणास्थित श्रीमती रेड्डी यांनी क्लिमॉम कंपनीच्या नावाने दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. कंपनीच्या त्या संस्थापक आणि सीईओ आहेत. देशी गायीचे दूध व त्यापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची क्लिमॉम कंपनी निर्मिती व विक्री करते. दुग्धव्यवसायात फार कमी वेळात घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या श्रीमती रेड्डी यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या अनेक मुलाखती आपण येथे, येथे आणि येथे पाहू शकता.

द हंस इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपला प्रवास सांगितला होता. दुधामध्ये होणारी भेसळ आणि त्याचे दुष्परिणामांविषयी कळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना असे दूध न देण्याचा निर्णय घेतला. मग त्यांना शुद्धा दूध कसे मिळणार? या विचारातून त्यांनी गोशाळा सुरू केली. सुरुवातील केवळ मुले आणि कुटुंबासाठी सुरू केलेला हा प्रयत्न हळूहळू वाढत गेला आणि त्याचे क्लिमॉम या कंपनीनिमित्ताने व्यवसायात रुपांतर झाले.

मूळ मुलाखत येथे वाचा – द हंस इंडियाडेक्कन क्रोनिकल

हैदराबाद पीडिता कोण होती?

27 नोव्हेंबर रोजी सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील 26 वर्षीय पीडिता पशुवैद्यक होती. तसेच ती अविवाहित होती. अल्लोल दिव्या रेड्डी विवाहित आणि त्यांना मुले आहेत. फॅक्ट क्रेसेंडोला सायबराबाद पोलिसांनी यापूर्वी दिलेल्या माहितीवरून सदरील व्हिडियोतील तरुणी हैदराबाद पीडिता नाही हे स्पष्ट होते.

निष्कर्ष

तेलंगणास्थित स्वयंउद्योजिका श्रीमती अल्लोल दिव्या रेड्डी यांचा व्हिडियो हैदराबाद पीडिता म्हणून चुकीच्या पद्धतीने शेयर करण्यात येत आहे. वाचकांना आवाहन करण्यात येते की, खोट्या माहितीसह हा व्हिडियो शेयर करू नये. तसेच अशी काही संशयास्पद माहिती/व्हिडियो आपल्याकडे असल्यास तो फॅक्ट क्रेसेंडोकडे पडताळणीसाठी पाठवावा. त्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) संपर्क साधू शकता.

Avatar

Title:केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणारी तरुणी हैदराबाद पीडिता नाही. त्या स्वयंउद्योजिका श्रीमती अल्लोला दिव्या रेड्डी आहेत.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False