गुजरातमधील असंबंधित व्हिडिओ आसाममध्ये बांग्लादेशींना मारहाण म्हणून व्हायरल

False राजकारण | Politics

बांग्लादेशमध्ये अलीकडे हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराशी जोडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर पोलिस आणि लोकांची गर्दी दिसते. काही जण काही तरुणांना काठ्यांनी मारहाण करताना दिसतात.

हा व्हिडिओ शेअर करताना असा दावा केला जात आहे की ही घटना असममधील असून बांग्लादेशी लोकांना मारहाण केली जात आहे.

पोस्टसोबत एका युजरने लिहिले आहे, “आसाममध्ये बांग्लादेशीयांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यांनी आपल्या भावांबरोबर जे केलं, तसंच आता आपण त्यांच्यासोबत करायला हवं.”

फॅक्ट चेक

व्हायरल व्हिडिओमधील काही फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हा व्हिडिओ ‘News18 India’च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर सापडला.

२८ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या या बातमीनुसार, गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात पोलिसांकडून हत्या प्रकरणातील आरोपींना सार्वजनिक ठिकाणी काठ्यांनी मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे.

ही घटना २० डिसेंबर रोजी झालेल्या भरत चौधरी यांच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणात अटक केलेल्या ६ आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन घटनेची पुनर्रचना (recreation) करताना हा प्रकार घडला.

तपासादरम्यान आम्हाला भास्कर इंग्लिशच्या वेबसाइटवरही याबाबत रिपोर्ट मिळाला. त्यानुसार, पालनपूर येथे अहमदाबाद हायवेवरील रामदेव हॉटेलजवळ काही लोकांनी हल्ला करून भरत चौधरी यांची हत्या केली होती.

या प्रकरणात लालो निमेष मंडोरा, रिकी नोएल, भरत भूराजी राजपूत, भौतिक जगदीश परमार, गणपत सेनजी ठाकोर आणि अनिल शंकर बावरी या आरोपींना अटक करण्यात आली होती.

या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडीत पाठवण्यात आले. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी सकाळी पोलिसांनी सर्व आरोपींना पालनपूरमधील अरोमा सर्कल येथे घटनास्थळाची पुनर्रचना करण्यासाठी आणले होते. त्यावेळी उपस्थित लोकांनी कठोर शिक्षेची मागणी करत घोषणाबाजी केली. याच दरम्यान पोलिसांनी आरोपींना काठ्यांनी मारहाण केल्याचे दिसते.

निष्कर्ष

तपासातून स्पष्ट होते की असममध्ये बांग्लादेशी लोकांना मारहाण केल्याचा दावा चुकीचा आहे. हा व्हायरल व्हिडिओ गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथील असून, तो हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी मारहाण केल्याचा आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आहे.

Result Stamp

Title: गुजरातमधील असंबंधित व्हिडिओ आसाममध्ये बांग्लादेशींना मारहाण म्हणून व्हायरल

Written By: Agastya Deokar

Result: False