बसमध्ये जागा न मिळाल्याने चालकाच्या जागी बसलेल्या महिलेचा हा व्हिडिओ स्क्रीप्टेड; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात 50 टक्के सवलत दिली आहे. या बातमीनंतर महिला मोठ्या संख्येने बसमध्ये प्रवास करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. 

अशाच गर्दीमुळे एका महिलेने बसमध्ये जागा न मिळाल्याने वाहन चालकाच्याच जागी जाऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महिलेला उठवण्याचा प्रयत्न केल्यावर ती जागा सोडण्यास नकार देते. दावा केला जात आहे की, ही घटना खरी असून राजस्थानमध्ये घडलेली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  

पडताळणीअंती कळाले की, ही घटना खरी नसून हा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवलेला आहे. चुकीच्या दाव्यासह स्क्रीप्टेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओसोबत युजर्स कप्शनमध्ये लिहितात की,“राजस्थानमध्ये एक महिला आणि तिची सून गर्दीच्या बसमध्ये चढतात. सासूबाईस ला जागा मिळते. सून देखील जागेचा शोध घेते, ड्रायव्हरची सीट रिकामी पाहते आणि ती व्यापते. जेव्हा ड्रायव्हर येतो आणि त्या बाईला त्याची जागा सोडायला सांगतो तेव्हा ती त्याला मागे जाऊन कुठेही बसायला सांगते. त्याला बस चालवायची आहे, असे तो म्हटल्यावर ती त्याला दुसऱ्या सीटवरून चालवायला सांगते. तिची सासूही तिला साथ देते…कॅमेरा ने खरी घटना टिपली.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ दोन वर्षांपासून उपलब्ध आहे. 

एका युट्युब चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘हेमा प्रजापत’ असे नाव दिसते.

संबंधित कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाल की, हेमा प्रजापत ह्या एक युट्युबर असून ‘एचपी म्यूजिक एन्ड व्लॉग’ नावाचे त्यांचे चॅनल आहे. तसेच त्यांचे नाव युट्युबवर सर्च केल्यावर त्यांनी अभिनय केले इतर ही व्हिडिओ दिसतात.

पुढे फॅक्ट क्रेसेंडोने हेमा प्रजापत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट सांगितल की, व्हायरल व्हिडिओमधील घटना खरी नाही. हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनविण्यात आला होता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, ही घटना खरी नसून हा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवलेला आहे. चुकीच्या दाव्यासह स्क्रीप्टेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:बसमध्ये जागा न मिळाल्याने चालकाच्या जागी बसलेल्या महिलेचा हा व्हिडिओ स्क्रीप्टेड; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False