सुधारित नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर बांग्लादेशातून आलेल्या बेकायदा स्थलांतरितांची मुद्दा पुन्हा एकदा गरम झाला आहे. बांग्लादेशातून होणाऱ्या घुसखोरीला रोखण्यासाठी सरकारने गेल्या तीन वर्षांत भारत-बांग्लादेश सीमा पूर्णतः सीलबंद केल्याचा दावा करण्यात येत आहे. सोबत सीमेवर रात्री लक्ष ठेवण्यासाठी दिव्यांची रोषणाई असणारा फोटो दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

भारत-बांग्लादेशच्या सीमेवर लावलेल्या दिव्यांचा फोटो म्हणून एक छायाचित्र दिले आहे. सोबत लिहिले की, जे कधी नाही झाले ते मोदी सरकारने तीन वर्षांत करून दाखविले. संपूर्ण बांग्लादेश सीमा सीलबंद करण्यात आली असून, एकुण 647 किमी अंतरापर्यंत दिवे लावण्यात आले आहेत. जेणेकरून आपल्या जवानांना सीमेवर नजर ठेवणे सोपे होईल.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो भारत-बांग्लादेश सीमेचा नाहीच. हा फोटो तर स्पेन-मोरक्को सीमेचा आहे. टाईम्स ऑफ इंडियाने 14 जून 2017 रोजी दिलेल्या वृत्तानुसार, गृह मंत्रालयाने 2017 साली वार्षिक अहवालामध्ये चुकीने स्पेन-मोरक्को सीमेचा हा फोटो भारत-पाकिस्तानचा म्हणून प्रसिद्ध केला होता. ही चूक लक्षात आल्यावर सरकारवर चोहीबाजूने टीका झाली होती.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाएनडीटीव्ही

ऑल्ट न्यूजच्या रिपोर्टनुसार, हा फोटो स्पेनचे छायाचित्रकार हाविएर मोयानो यांनी 2006 साली काढला होता. आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील स्पेनच्या क्युटो शहराची मोरोक्कोशी 6.5 किमी अंतराची सीमा आहे. या सीमेवर अशा पद्धतीने दिवे लावण्यात आलेले आहेत. यावरून हे सिद्ध होते की, हा फोटो भारत-बांग्लादेश सीमेचा नाही.

भारताने संपूर्ण बांग्लादेश सीमा सीलबंद केली का?

भारत-बांग्लादेशमध्ये सुमारे चार हजार किमीची सीमा आहे. एनडीटीव्हीनुसार, तत्कालिन गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी 2016 मध्ये म्हटले होते की, 2018 च्या मध्यापर्यंत बांग्लादेशाची सीमा पूर्णतः सील होईल. एकुण 223 किमी अंतराच्या सीमेवर अत्याधुनिक सुरक्षायंत्रणा बसवून घुसखोरी रोखण्यात येईल असे ते म्हणाले होते.

बिझनेस स्टॅंडर्सच्या 4 फेब्रुवारी 2019 रोजीच्या बातमीनुसार, सीमा सील करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. संसद व्यवहार मंत्री चंद्रमोहन पतवरी यांनी माहिती दिली होती की, केंद्रातर्फे सील करण्याच्या कामात अनेक अडचणी येत असल्यामुळे प्रकल्पपूर्तीला उशीर होत आहे. सततचा पाऊस, असमतोल पृष्ठभाग आणि निधीची कमी आदी कारणांमुले विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

इंडिया टुडेच्या 5 मार्च 2019 रोजीच्या बातमीनुसार, आसाममधील धुबरी जिल्हातील 60 किमी भारत-बांग्लादेश सीमेवर अत्याधुनिक सोनार यंत्रमा बसविण्याच्या कामाचे राजनाध सिंह यांनी उद्घाटन केले होते.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे

मग कोणत्या सीमेवर 647 किमी अंतरापर्यंत दिवे लावण्यात आले?

सरकारने 2017 साली सांगितले होते की, पाकिस्तान आणि बांग्लादेश सीमेवर 647 किमी दिवे लावण्यात आले. 2016 साली हे काम पूर्ण झाल्याचेही सरकारने घोषित केले होते. या कामासाठी 5100 कोटी रुपयांची तरतुद केली होती. याचा अर्थ की, दिवे केवळ बांग्लादेश सीमेवर नाही तर पाकिस्तान व बांग्लादेश सीमा मिळून बसविण्यात आले होते.

निष्कर्षः

दिव्यांनी उजळून निघालेली भारत-बांग्लादेश सीमेचा फोटो म्हणून शेयर करण्यात येणारे छायाचित्र स्पेन-मोरोक्को सीमेचे आहे. त्यामुळे चुकीचे छायाचित्र दाखवण्यात आले आहे. 

Avatar

Title:भारत-बांग्लादेश सीमा म्हणून स्पेन-मोरोक्को सीमेवरील दिव्यांचा फोटो व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar

Result: False