
प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीने त्यांना शिरूर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. महाराष्ट्रातील अटातटीची ‘स्टार’ लढत म्हणून याकडे पाहिले जात आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अमोल कोल्हेंचे एका मुलीसोबत पावसात रोमांन्स करतानाचे फोटो पसरविले जात आहे. अमोल कोल्हेंचा ‘खरा चेहरा’ जनतेसमोर आणणारे हे फोटो असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.
फेसबुकवरील पोस्टमध्ये अमोल कोल्हे एका तरुणीसोबत पावसात रोमान्स करताना दिसतात. सोबत लिहिले की, पडद्यामागचा खरा चेहरा. जनेतेला (अमोल कोल्हे) तुमचा खरा चेहरा कळलाय. आजपर्यंत तु्म्ही खूप भावनिक राजकारण खेळलात. पण यापुढे नाही. तुम्हाला अम्हीच धडा शिकवणार. तसेच ‘अरे हा कसला मावळा, हा तर टपोरी कावळा‘ असा टोमणादेखील मारला आहे.
या पोस्टखाली अनेकांनी “लाज वाटत कशी नाय”, “त्याला लाज नाय”, “निषेध”, “लबाड कोल्हा” अशा कमेंट करून डॉ. कोल्हेंवर टीका केली आहे.
तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये दिलेले फोटो एखाद्या व्हिडियोमधील सीन असल्याचे दिसते. त्यानुळे आम्ही युट्यूबवर Amol Kolhe Romantic Songs असे सर्च केले. तेव्हा आम्हाला अल्ट्रा मराठी या युट्यूब चॅनेलचा एक व्हिडियो आढळला. ‘चिंब मी चिंब तू’ नावाचे हे गाणे आहे. यामध्ये अमोल कोल्हे यांनी अभिनय केला आहे. गंध गारवा नावाच्या म्युझिक अल्बममधील हे गाणे अमोल बावडेकर आणि नेहा राजपाल यांनी गायले आहे.
फेसबुक पोस्टमध्ये दिलेले फोटो या गाण्याच्या व्हिडियोमधील स्क्रीनशॉट आहेत. त्यांचा अमोल कोल्हे यांच्या खासगी जीवनाशी काही संबंध नाही.
गाना या ऑनलाईन म्युझिक स्ट्रीमिंग वेबसाईटवरील माहितीनुसार ‘गंध गारवा’ हा अल्बम 2006 साली प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये एकूण आठ गाणी होती. या अल्बमला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा – गाना

निष्कर्ष
चिंब मी चिंब तू नामक गाण्याच्या व्हिडियोमधील स्क्रीनशॉट शेयर करून त्यांचा अमोल कोल्हे यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंध लावला जात आहेत. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Title:WATCH: म्युझिक व्हिडियोमधील रोमँटिक फोटो दाखवून अमोल कोल्हेंच्या खासगी जीवनावर टीका
Fact Check By: Mayur DeokarResult: False
