
विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांच्या नावे एक विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. फेसबुकवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेयर करून दावा करण्यात येत आहे की, गोमुत्र पिल्यामुळे माझे सौंदर्य वाढले असे साध्वी प्राची म्हणाल्या. वन इंडिया वेबसाईटवरील बातमीचा हा कथित स्क्रीनशॉट आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
वन इंडिया हिंदी वेबसाईटच्या बातमीचा स्क्रीनशॉट फेसबुक पोस्टमध्ये शेयर करण्यात आला आहे. यामध्ये साध्वी प्राची वृत्त माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिसतात. बातमीचे शीर्षक आहे की, रोजाना गौ मूत्र पीने से मेरी सौंदर्य में वृद्धि होती है। यावरू युजरने लिहिले की, इतना विकास भारत को एक दिन विश्व गुरू बना के ही छोडेगा.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम वन इंडिया हिंदी वेबसाईटने अशी बातमी दिली का याचा शोध घेतला. परंतु, त्यांच्या वेबसाईटवर अशा शीर्षकाची एकही बातमी सापडली नाही. त्यामुळे या बातमीच्या सत्यतेबाबत शंका निर्माण होते.
पोस्टमधील स्क्रीनशॉटला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून वन इंडिया हिंदी वेबसाईटवरील 10 जून रोजीची एक बातमी आढळली. या बातमीच्या थम्बनेलमधील फोटो आणि फेसबुक पोस्टमधील फोटो एकसारखाच आहे. परंतु, या बातमीचे शीर्षक अलीगढ़ केस पर भड़की साध्वी प्राची, बोलीं- इन दरिंदों को सड़क पर पेट्रोल डालकर जिंदा जला दो असे आहे.

अलिगड येथे अडीच वर्षांच्या चिमुकलीच्या हत्येवर संताप व्यक्त करताना साध्वी प्राची म्हणाल्या की, हत्याऱ्यांना भर रस्त्यात पेट्रोल टाकून जिवंत जाळले पाहिजे. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एका अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगात फेकून दिला होता. या प्रकरणावरून सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
अमर उजालाच्या युट्युबर चॅनेलवर साध्वी प्राची यांचा प्रतिक्रिया देताना व्हिडियो अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये त्या म्हणतात की, अलिगड मे ढाई साली के मासूम के साथ जो दर्दनाक घटना घटी है, उससे सारे देश में बच्चा बच्चा आक्रोशित है. उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगीजी से मैं प्रार्थना करूंगी की, अपराधी, बदमाशों के एन्काउंटर करा रहे हो ना… कम से कम सैंकडो एन्काउंटर इन दरिंदो के करा दो, तो ही उत्तर प्रदेश में बच्चियां सुख शांती से रहेंगी. आज ढाई साल की बच्ची भीं उत्तर प्रदेश में इतनी असुरक्षित हो गई की बच्चियों को पालना कठिण काम हो गया है. बेटियां आखिर जाए तो कहा जाए? और मोमबत्ती जलानें वालो से मैं कहुंगी की, मोमबत्ती से अब काम नहीं चलेगा. इन दरिंदो को पेट्रोल डालकर जलाओ.
वन इंडिया हिंदीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्यांची बातमी शेयर करण्यात आली होती ती तुम्ही खाली पाहू शकता.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
वरील पोस्टचा स्क्रीनशॉट आणि गोमुत्राच्या बातमीचा स्क्रीनशॉट यांची तुलना केल्यावर लक्षात येते की, मूळ बातमीचे शीर्षक एडिट करून तेथे गोमुत्रविषयक विधान टाकण्यात आले. दोन्ही फोटोंची तुलना तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष
साध्वी प्राची यांनी गोमुत्रामुळे त्यांच्या सौंदर्यात वृद्धी झाली असे म्हटलेले नाही. मूळ बातमीच्या स्क्रीनशॉटला एडिट करून शीर्षक बदलून गोमुत्राचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:FAKE ALERT: गोमुत्र पिल्यामुळे माझे सौंदर्य वाढले, असे प्राची साध्वी म्हणाल्या नाही. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
