
अयोध्येतील एका साधूचे छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत असून या साधूचा मृत्यू भुकेमुळे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या साधूवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांचे पार्थिव नदीत फेकल्याचा दावाही काही जण करत आहेत. अयोध्येत खरोखरच अशी काही घटना घडली का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
या घटनेबाबतचे तथ्य जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम अयोध्येचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष तिवारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, समाजमाध्यमात या साधूविषयी चुकीची आणि असत्य माहिती पसरविण्यात येत आहे. या साधूचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांनी झालेला आहे. त्यांच्या पार्थिवावर साधू समाजाने त्यांच्या परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार केले आणि त्यास जलसमाधी दिली. या पार्थिवाचे शवविच्छेदन करु नये, असे साधू समाजाने आम्हाला लिखित स्वरुपात दिले होते. समाजजमाध्यमात याबाबत चुकीची माहिती पसरत असल्याने साधू समाजाने याबाबत लिखित तक्रारही दिली आहे. त्यांची खाण्यापिण्याच्या गोष्टींची कोणतीही कमतरता जाणवत नसल्याचेही त्यांनी कळवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, या घटनेत रात्री उशिरा आम्हाला साध्या कागदावर लिहिलेल्या दोन गोष्टी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील एका कागदावरुन आम्हाला साधूचे नाव कळाले होते. मृत्यू झालेल्या साधूचे नाव विष्णू दास असून त्याचे वय 80 आहे. या कागदावर स्पष्टपणे लिहिलेले आहे की, त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तूंची कोणतीही कमतरता नाही. मृत्यू नैसर्गिकरितीने झाला असल्याने या साधूंना शवविच्छेदन करण्याची गरज वाटत नव्हती. त्यांनी दिलेल्या कागदावर स्पष्टपणे लिहिले आहे की, साधू समाजाच्या रिती-रिवाजानूसार मृतदेह जलप्रवाहित करण्यात आला आहे.
या साधूंनी लिखित स्वरुपात दिलेली माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ फॅक्ट क्रेसेंडोला प्राप्त झाले. ते आपण खाली पाहू शकता.



या घटनेबाबतचे स्पष्टीकरण साधु समाजाच्या साधूंनी व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे ते आपण खाली पाहू शकता.
फॅक्ट क्रेसेंडोने त्यानंतर अयोध्येतील कोतवाली पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, समाजमाध्यमात चुकीची माहिती पसरत आहे. याप्रकरणात खोटी माहिती पसरविल्याबद्दल तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तुफेल जो हा 5 समाचार या पोर्टलचा संचालक आहे. दुसरी व्यक्ती दिलीप मोर्य हे बातमीदार आहेत. तिसरा गुन्हा इंडियन टाईम्स समाचारवर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुखदेव गिरी यांनी फिर्याद दिली आहे.
अयोध्या पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरही याबाबतचा खुलासा केला आहे.
निष्कर्ष
अयोध्येतील साधुचा मृत्यू भुकेमुळे झाल्याचा दावा असत्य आहे. साधुचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला आहे. पार्थिव पोलिसांनी नदीत टाकले नसून साधु समाजाने त्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे ते नदीत प्रवाहित केले. या साधूबाबत चुकीची माहिती पसरविल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Title:अयोध्येतील साधूचा मृत्यू भुकेमुळे झालेला नाही; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
