अर्धवट व्हिडिओ: अशोक गहलोत यांनी अमृतपाल सिंहचे समर्थन केले नाही; वाचा सत्य

Altered राजकीय | Political

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा एका व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये ते खलिस्तानची मागणी करणाऱ्या अमृतपाल सिंहला कथितरीत्या समर्थन देत असल्याचे दिसते. व्हायरल क्लिपमध्ये ते पत्रकारांशी बोलताना अमृतपाल सिंहने खलिस्तानबाबत केलेली मागणी योग्य असल्याचे म्हणतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल क्लिप अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये अशोक गहलोत यांनी अमृतपाल सिंहच्या खलिस्तानच्या मागणीचा विरोध केला असून ही देशासाठी धोक्याची बाब असल्याचे म्हटले होते. 

काय आहे दावा ?

या दहा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये अशोक गहलोत म्हणतात की, “अमृतपाल सिंह म्हणतोय की, जर हे लोक हिंदु राष्ट्राबद्दल बोलतात तर मी खलिस्तानबद्दल का बोलू नये ? त्याचे असे बोलने किती स्पष्ट आहे.”

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की,“खालिस्तानचे स्वप्न पाहणाऱ्या अमृतपालचे समर्थन करणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, ही व्हिडिओ क्लिप मुख्यमंत्री अशोक गहलोत 31 मार्च 2023 रोजी राजस्थानमधील भरतपूर या शहराच्या दौऱ्यावर गेलले असतानाची आहे. 

गेहलोत भाषणात म्हणाले की, मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूंच्या गप्पा करतात, यामुळेच तर अमृतपाल खलिस्तानबद्दल बोलण्याची हिंमत करतो.

झी-राजस्थानच्या युट्यूब चॅनलवर अशोक गेहलोत यांच्या या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.

वरील भाषण पाहिल्यावर कळते की, अशोक गहलोत यांनी कुठे ही खलिस्तान किंवा अमृतपाल सिंहचे समर्थन केले नाही.

मूळ व्हिडिओमध्ये अशोक गहलोत म्हणतात की, “पंजाबमध्ये एक नवीन व्यक्ती आला आहे, त्याचे नाव अमृतपाल आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जर हिंदुराष्ट्राबद्दल बोलतात तर मी खलिस्तानबद्दल का बोलू नये ? असे तो (अमृतपाल) म्हणतो. त्याची हिंमत तुम्ही बघा. त्याला हिंमत मिळाली आहे कारण, तुम्ही हिंदु राष्ट्राविषयी बोलता. आज धर्माच्या नावावर लोकांना खुश करणे सोपे झाले आहे.”

ते पुढे म्हणतात, “इमारत बांधायला वेळ लागतो आणि ती इमारत पाडायची असेल तर बुलडोझर पाठवावे लागते, जसे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ बुलडोझर पाठवतात. आपण विचार करू शकता, त्या विचारांना मोडू शकता. परंतु, विचारांना जोडने हे एक कठीण काम आहे. त्यामुळे अमृतपालला असे विधान करण्याची हिंमत आली आहे. इंदिरा गांधी यांनी खलिस्तानची निर्मिती केली नाही.

हे वक्तव्य आपण येथे पाहू शकतात.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणतात की, अमृतपाल सिंहची वेगळ्या खलिस्तानची मागणी ही देशासाठी धोक्याची बाब आहे.

निष्कर्ष

यावरुन स्पष्ट होत की, व्हायरल होत असलेली क्लिप अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये अशोक गहलोत यांनी अमृतपाल सिंहच्या वेगळ्या खलिस्तान मागणीचा विरोध केला असून ही देशासाठी धोक्याची बाब असे ते म्हणाले होते. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अर्धवट व्हिडिओ: अशोक गहलोत यांनी अमृतपाल सिंहचे समर्थन केले नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Altered