पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘वंचित’ला विधानसभा निवडणुकांसाठी 50 जागांची ऑफिर दिली का?

False राजकीय

लोकसभा निवडणुकीचा ज्वर अद्याप कमीदेखील झाला नाही की, राजकीय पक्ष आता आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाने तयारी करीत आहेत. नवे राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत. सोशल मीडियावर सध्या पोस्ट फिरत आहे की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी 50 जागा सोडण्याची ऑफर दिली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

काँग्रेसचे वरीष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून विधानसभेसाठी वंचितला 50 जागांची ऑफर

तथ्य पडताळणी

महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामारे जावे लागले. काँग्रेसची केवळ एकच जागा निवडूण आली. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभेत हाच कित्ता पुन्हा गिरवला जाऊ नये आणि पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी मोठ्या बदलांची गरज असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीआधीसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडी प्रकाश आंबेडकरांना सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, जागांच्या वाटाघाटीमुळे वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. याचा सर्वाधिक फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला. त्यामुळे काँग्रेसने वंचितला खरंच 50 जागा देण्याचा प्रस्ताव दिला असेल का?

गुगलवर या संदर्भात कोणतीही बातमी उपलब्ध नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी अशी काही ऑफर दिली असती तर ती नक्कीच ब्रेकिंग न्यूज ठरली असती. पण तसे काही आढळून आले नाही. त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरदेखील यासंदर्भात काही माहिती शेयर करण्यात आलेली नाही. न्यूज-18 लोकमत वृत्तवाहिनीने लोकसभा निकालानंतर 24 मे रोजी पृथ्वीराज चव्हाणांची मुलाखत घेतली होती. यामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करीत म्हटले की, वंचितचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला. आम्ही वेळोवेळी प्रस्ताव देऊनही प्रकाश आंबेडकरांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. ही मुलाखत तुम्ही येथे पाहू शकता – न्यूज-18 लोकमत

24 मे रोजी लोकसत्ता दैनिकाशी बोलताना त्यांनी उग्र राष्ट्रवाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा भाजपला फायदा झाल्याचे म्हटले होते. तसेच भाजपने वंचित बहुजन आघाडीचा वापर करून घेतल्याचीही टीका त्यांनी केली.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले. पुणे मिरर दैनिकातील बातमीनुसार आंबेडकरांनी काँग्रेसलाच पराभवास कारणीभूत ठरविले. उलट काँग्रेसनेच मुस्लिम मतदारांना वंचितपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांनी आरोप केला. त्यामुळे काँग्रेसने वंचितवर टीका करण्यापेक्षा पराभवाची कारणे आत्मपरीक्षणातून शोधून काढावीत, असा सल्ला दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीचे धोरण ठरविण्यासाठी वंचितची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र विधानसभेच्या संपूर्ण 288 जागा लढविण्याची घोषणा केलेली आहे. त्यांनी काँग्रसेकडून काही जागा वाटपाची ऑफर आल्याविषयी काही वक्तव्य केलेले नाही.

मूळ बातमी येथे वाचा – पुणे मिररअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयाशी संपर्क केला. त्यांचे स्वीय सहायक गजानन आवळकर यांनी मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचितला 50 जागांचा प्रस्ताव दिला हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. ”पृथ्वीराज चव्हाणा यांनी कोणत्याही पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपाचा प्रस्ताव दिलेला नाही. सोशल मीडियावर केला जाणारा तसा दावा खोटा आहे”, असे म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

निष्कर्ष

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी 50 जागा दिल्याचे वृत्त असत्य असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षातर्फे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Avatar

Title:पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘वंचित’ला विधानसभा निवडणुकांसाठी 50 जागांची ऑफिर दिली का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False