
तब्बल एका वर्षांच्या विश्रामानंतर कोरोना विषाणुचे संकट पुन्हा एकदा घोंघावत आहे. चीन आणि सिंगापूरमध्ये कोविडच्या नव्या सबव्हेरिएंटने हाहाकार माजवलेला आहे. भारत सरकारदेखील त्यामुळे सतर्क झाले असून, पुन्हा एकदा कोविड नियमावली जारी करण्याचा विचार केला जात आहे.
अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर नरेंद्र मोदी लॉकडॉऊनची घोषणा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याद्वारे दावा केला जात आहे की, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा ‘जनता कर्फ्यू’ घोषित केला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली आहे.
आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे. नरेंद्र मोदी यांचा ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
काय आहे दावा ?
व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी म्हणताता की, “कोविड–19 चे अद्याप निदान सापडले नसून, कोविड प्रतिबंधक लसदेखील विकसित झालेली नाही. सर्व नागरिकांनी सावधगीरी बाळगली तरीदेखील संकट टळलेले नाही. सरकारी कर्मचारी वगळता सर्व नागरिकांनी घराच्या बाहेर न निघता सामाजिक अंतराचे पालन करावे.”
हा व्हिडिओ शेअर करत युजर्स लिहितात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीवर्ड सर्च केल्यावर कळले की, हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, 19 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात ‘जनता कर्फ्यू’चे पालन करण्याचे आवाहन केले होते.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रात मदत करण्यासाठी ‘कोविड-19 इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स’ स्थापन करण्याची घोषणा केली. लोकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना घाबरू नये, असेही पंतप्रधान म्हणाले होते.
व्हायरल व्हिडिओ टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीमध्ये पाहू शकता.

मूळ पोस्ट – टाईम्स ऑफ इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत युट्युब चॅनल आणि फेसबुकवर संपूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे. 19 मार्च 2020 रोजीच्या या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली होती.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, नरेंद्र मोदी यांनी ‘लॉकडाऊन’ जाहीर केलेल्याचा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला नाही; जुना व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
