
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करून काही आघाडीच्या कुस्तीपटूंचे दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर 23 एप्रिल पासून आंदोलन सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर एका विराट गर्दीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन म्हणून ही रॅली काढण्यात आली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ गेल्या वर्षी गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला जमलेल्या गर्दीचा आहे.
काय आहे दावा ?
गर्दीचा व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, “संपूर्ण जग ऑलिम्पिक कुस्तीपटू विजेत्यांच्या पाठीशी, पण मोडींचे डोळे काही उघडेना.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ गुजरातच्या सुरत शहराचा आहे.
तेथील भाजप आमदार संगिता पाटील यांनी 29 सप्टेंबर 2022 रोजी आपल्या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला होता. त्या कॅप्शनमध्ये लिहितात की, हा व्हिडिओ ‘निलगिरी सर्कल’चा आहे.
खालील पोस्टमध्ये आपण व्हायरल व्हिडिओसोबत गर्दीचे इतर व्हिडिओ क्लिप पाहू शकातात.
सदरील माहितीच्या आधारे सर्च केल्यावर काळाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2022 मध्ये गुजरातमधील सुरत आणि भावनगरच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी 29 सप्टेंबर रोजी सुरतमध्ये ‘रोड शो’ केला आणि निलगिरी सर्कल या भागात आपली सभा घेतली. संपूर्ण बातमी येथे पाहू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर ‘रोड शो’ आणि ‘सभेचा’ व्हिडिओ अपलोड केला आहे.
सदरील माहितीच्या आधारे गुगल मॅपवर सर्च केल्यावर निलगिरी सर्कल येथील चौकात राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा आढळला.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमधील पुतळा आणि मॅपमध्ये दिसणारा राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा ही एकच आहे.

निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील गर्दी महिला कुस्तीपटूंच्या समर्थनाची नाही. ही गर्दी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरतमधील सभेनंतरची आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:कुस्तीपटूंच्या आंदोलनाला जमलेली गर्दी म्हणून नरेंद्र मोदींच्या सभेचा जुना व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
