
महिन्याच्या सुरुवातीला सादर झालेल्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत म्हटले जात आहे, की उद्धव ठाकरेंनी स्वतः मान्य केले त्यांना बजेटमधले काही कळत नाही.
उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या बजेटवर प्रतिक्रिया देताना खरंच असे वक्तव्य केले का, याबाबत विचारणा करत फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले, की हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
एका कार्यक्रमाच्या मंचावर उद्धव ठाकरे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सांगतात, की, “निर्मलाजी मी खरं सांगतो, आधी मला बजेटमधील काहीच माहित नव्हते. मला ते समजेपर्यंत तर तुमचे पुढचे बजेट आलेले असायचे. एक पक्षप्रमुख असल्यामुळे मला बजेटवर प्रतिक्रिया द्यावीच लागायची. म्हणून मी मग एक दिवस आधीच प्रतिक्रिया द्यायचे ठरवले. माझी ठरलेली प्रतिक्रिया असायची, की हे बजेट श्रीमंतांना श्रीमंत आणि गरिबांना गरीब करणारे बजेट आहे. मध्यमवर्गीयांसाठी काहीच तरतूद नाही, जीडीपी आणखी खाली जाईल वगैरे वगैरे. पण आता मी नाही म्हणू शकत मी मला कळत नाही. आता मुख्यमंत्री झाल्यापासून तर मला ते समजूनच घ्यावे लागते.”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कोणत्या कार्यक्रमातील आहे ते पाहुया. कीवर्ड सर्चद्वार कळाले, की हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी आहे.
सीएनबीसी टीव्ही-18 वाहिनीद्वारे 28 फेब्रुवारी 2020 आयोजित इंडियन बिजनेस लीडर्स अॅवॉर्ड सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.
सीएनबीसी टीव्ही-18 वाहिनीच्या युट्यूबवर उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याचा संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे.
या सोहळ्यात महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळाला होता. निर्मला सीतारमण यांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांनी तो स्वीकारला होता.
पुरस्काराला उत्तर देताना उद्धव ठाकरे असे म्हणाले होते की, पक्षप्रमुख असताना बजेटविषयी त्यांना पूर्ण माहिती नव्हती. परंतु, आता मुख्यमंत्री झाल्यापासून ते बारकावे शिकले आहेत.
सोबत निर्मला सीतारमण यांची फिरकी घेताना ठाकरे म्हणाले होते, की चांगला अर्थमंत्री तोच असतो जो एखाद्या व्यक्तीचे पैसे कापले केले तरी त्याला कळू देत नाही. निर्मालाजी मग आपण चांगल्या अर्थमंत्री आहात की नाही?
मूळ व्हिडिओ आपण 3.40 मिनिटांपासून पुढे पाहू शकता.
मग यावर्षी ठाकरे यांनी बजेटवर काय प्रतिक्रिया दिली?
उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली होती, की “वाढती बेरोजगारी, महागाई, सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रय शक्ती कमी होत असताना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु लोकमनातील अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेली दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे.”
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, उद्धव ठाकरे यांचा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ यंदाचा म्हणून व्हायरल होत आहे. चुकीच्या संदर्भासह जुनी क्लिप फिरवली जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:उद्धव ठाकरे यांचा जुना व्हिडिओ त्यांची यंदाच्या बजेटवरील प्रतिक्रिया म्हणून व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: Misleading
