निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर पोस्टर फाडल्याचा दावा खोटा, जुना व्हिडिओ नव्या घटनेशी जोडून व्हायरल

False international

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना कराकसमध्ये अमेरिकन सैन्याने ३ जानेवारी २०२६ रोजी ताब्यात घेतले.

याच दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक निकोलस मादुरो यांचे पोस्टर फाडताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, अमेरिकन सैन्याने मादुरो यांना पकडल्यानंतर व्हेनेझुएलातील नागरिक त्यांचे पोस्टर फाडत आहेत.

पोस्टसोबत असा कॅप्शन देण्यात आला आहे – “आज अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. सध्या व्हेनेझुएलामध्ये अमेरिकाप्रेमी विरोधक निकोलस मादुरो यांचे पोस्टर काढत आहेत.”

फॅक्ट चेक

रिव्हर्स इमेज सर्च मध्ये हा व्हिडिओ ३० जुलै २०२४ रोजी एका एक्स (ट्विटर) अकाउंटवर अपलोड केलेला आढळला. यावरून स्पष्ट झाले की हा व्हिडिओ सध्याचा नसून जुना आहे.

पुढील शोधात आम्हाला हाच व्हिडिओ न्यूजफ्लेयरवर जुलै २०२४ मध्ये अपलोड केलेला सापडला. त्याच्या कॅप्शननुसार, व्हेनेझुएलामधील निवडणुकांबाबत नाराजी व्यक्त करताना माराके येथे आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष मादुरो यांचा बिलबोर्ड पाडला होता.

तसेच हा व्हिडिओ ३० जुलै २०२४ रोजी यूट्यूबवरही अपलोड करण्यात आलेला आढळला.

‘अल जझीरा’नुसार, २८ जुलै २०२४ रोजी व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय निवडणूक परिषदेनं (CNE) निकोलस मादुरो यांची तिसऱ्यांदा सहा वर्षांसाठी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विरोधी पक्षांनी याला विरोध करत देशभर आंदोलन केले होते.

निष्कर्ष

तपासातून स्पष्ट होते की आंदोलकांनी निकोलस मादुरो यांचे पोस्टर फाडतानाचा हा जुना व्हिडिओ आहे. याचा अमेरिकन सैन्याने त्यांना अटक केल्याच्या दाव्याशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे सोशल मीडियावर केला जाणारा दावा भ्रामक आहे.

Result Stamp

Title: निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर पोस्टर फाडल्याचा दावा खोटा, जुना व्हिडिओ नव्या घटनेशी जोडून व्हायरल

Written By: Agastya Deokar

Result: False